Headlines

“बारामती लोकसभेचा गड उद्ध्वस्त करू”, बावनकुळेंच्या टीकेवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल, म्हणाले, “त्यांनी आधी…” | NCP Ravikant Varpe criticize Chandrashekhar Bavankule over remark on Supriya Sule Baramati



भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (६ सप्टेंबर) बारामती दौऱ्यावर आले असताना बारामती लोकसभेचा गड उद्ध्वस्त करू, असं वक्तव्य केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. “ज्यांना जनतेतून निवडून येता आलं नाही त्यांनी बारामती लोकसभेचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नये,” असा टोला रविकांत वरपे यांनी लगावला. तसेच त्यांनी आधी जनतेतून निवडून यावं, असं आव्हानही त्यांनी दिलं.

रविकांत वरपे म्हणाले, “निर्मला सीतारमन बारामती दौऱ्यावर येत आहेत. आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले बारामतीचा गड आम्ही उद्ध्वस्त करणार आहे. ज्या बावनकुळेंना साधं विधानसभेचं तिकीट मिळालं नाही, जनतेतून निवडून येता आलं नाही, त्यांना विधान परिषदेवर जावं लागलं. तेच आज बारामती जिंकण्याची भाषा करत आहेत.”

“सुप्रिया सुळे सलग तीन लोकसभा जनतेतून निवडून आल्या”

“निर्मला सीतारमन देशाच्या अर्थमंत्री आहेत. त्या २०१४ पासून राज्यसभेच्या सदस्य आहेत. त्या निर्मला सीतारमन लोकसभेच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याची भाषा करतात. सुप्रिया सुळे राज्यसभेवर खासदार होत्या, पण त्यानंतर त्या १५वी, १६वी, १७वी लोकसभा अशा सलग तीन लोकसभा जनतेतून निवडून आल्या आहेत,” असं रविकांत वरपे यांनी म्हटलं.

“सीतारमन यांना फार काळ राज्यसभेवर राहायचं नसेल, तर त्यांनी…”

वरपे पुढे म्हणाले, “निर्मला सीतारमन यांचं मी स्वागत करतो. त्यांनी निश्चित बारामती लोकसभा बघायला यावं. त्यांना फार काळ राज्यसभेवर राहायचं नसेल, तर त्यांनी सुप्रिया सुळेंनी बारामती लोकसभा मतदारसंघात जो विकासकामांचा डोंगर उभा केला आहे, बारामती लोकसभेचं मॉडेल उभं केलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडून घ्यावी. त्याचा उपयोग तुम्हाला २०२४ ला लोकसभेत निवडून येण्यासाठी निश्चित मदत होईल.”

“आधी जनतेतून निवडून यावे, मग बारामतीवर बोलावं”

“विधानपरिषदेवर आणि राज्यसभेवर नेतृत्व करणाऱ्यांनी आधी जनतेतून निवडून यावे, मग बारामती लोकसभेचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करावी. लोकसभेत सुप्रिया सुळेंचे हजेरी प्रमाण, लोकसभेतील उपस्थिती, उपस्थित प्रश्न, लोकसभेतील चर्चा सत्रात सहभाग, लोकसभेत मांडलेली खासगी विधेयके यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. तसेच राष्ट्रीय वयोश्री योजनेत सुप्रिया सुळेंचे काम देशात क्रमांक एकचे आहे,” असं वरपेंनी सांगितलं.

“२५ हजार मुलींना मोफत सायकलचे वाटप”

“२० हजारपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना जीवन सहाय्यक उपकरणांचे मोफत वितरण केले आहे, बारामती मतदारसंघातील २५ हजार मुलींना मोफत सायकलचे वाटप केले आहे, त्याचप्रमाणे ८ हजार कर्णबधिर मुलांना त्यांनी डिजीटल श्रवणयंत्र दिले आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

“अशांनी बारामती लोकसभेचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नये”

रविकांत वरपे पुढे म्हणाले, “विकासकामे, जलसंधारण, रेल्वेचे काम अशा विविध कामांमध्ये तर सुप्रियाताई देशात आघाडीवर आहेत. त्यामुळे ज्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही, ज्या राज्यसभेत खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत अशांनी बारामती लोकसभेचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नये. बारामती लोकसभेतील नागरिक सुजाण आहेत आणि बावनकुळेंचं गड उद्ध्वस्त करणारं विधान त्यांना हास्यास्पद वाटतं.”

हेही वाचा : “श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे पवारांना पळून…”, गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल; म्हणाले, “तुमच्या घराण्याने…”

“निर्मला सीतारामन यांना जर लोकसभेवर निवडून यायचं असेल, तर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास करावा. त्यांना याचा निश्चित फायदा होईल,” असंही त्यांनी म्हटलं.



Source link

Leave a Reply