बंडखोरीसाठी ५० कोटी घेतले; राऊतांच्या आरोपाला अब्दुल सत्तारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले… | each mla Took Rs 50 crore for mutiny Abdul Sattar respond over sanjay raut allegation aurangabad rmm 97



शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा आकडा आता ५० वर पोहोचला आहे. संबंधित आमदारांनी बंडखोरी करण्यासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या या आरोपाला बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

त्यांनी संजय राऊतांना बोचरा सवाल विचारत म्हटलं की, “संजय राऊत यांनी त्यांना मतदान करावं, म्हणून आम्हाला किती कोटी दिले? हे आई बापाची शपथ घेऊन सांगावं.” खरंतर, संजय राऊत हे राज्यसभा खासदार आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांनी त्यांना मतदान केलं होतं. याच पार्श्वभूमीवर सत्तार यांनी संजय राऊत यांना हा सवाल विचारला आहे. ते औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा- “संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादीत”, दीपक केसरकरांचा पुन्हा हल्लाबोल

आपल्याला काहीच नको, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हवेत- अब्दुल सत्तार
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारलं असता सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते. शिंदे गटाच्या वाट्याला किती राज्यमंत्री पदं आणि कॅबिनेट मंत्रीपदे येतात, हे पहावे लागेल. त्यानुसार वाटाघाटी आणि पुढील रुपरेषा ठरवली जाऊ शकते. तुम्हाला कोणतं पद अपेक्षित आहे, असं विचारलं असता ते म्हणाले की, “आपल्याला कोणतंच पद नको, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असावेत, एवढीच अपेक्षा आहे. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं पद हे कार्यकर्ता आहे. मला फक्त कार्य करायचं आहे. राजकारणात पदं येतात आणि जातात. पण मला माझ्या मतदारसंघासाठी काम करायचं आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर चार दिवसांत मला जेवढा निधी मिळाला; तेवढा निधी मी माझ्या राजकीय कारकीर्दीत कधीही पाहिला नाही,” असंही सत्तार म्हणाले.



Source link

Leave a Reply