Headlines

बंडखोर आमदारांविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात; संतोष बांगर, तानाजी सावंत यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई | uddhav thackeray shivsena takes action against rebel mla santosh bangar and tanaji sawant



शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यावा लागला. या बंडखोरीनंतर शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या प्रयत्नांना यश न आल्यामुळे आता शिवसेनेने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची जिल्हा प्रमुखपदावरुन तर तानाजी सावंत यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

हेही वाचा>>> “…तेव्हा लाज वाटली नव्हती का?”; शिंदे गटाचा ठाकरेंना रोखठोक सवाल

शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी विश्वासदर्शक ठरावादरम्यान ऐनवेळी एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. याआधी ते बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन करताना भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र ऐनवेळी त्यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता बांगर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा>>> “मध्यावधी निवडणुका लागतील असं म्हणालोच नाही,” शरद पवार यांचे स्पष्टीकरण

तर दुसरीकडे शिवसेनेचे सोलापूरमधील आमदार तानाजी सावंत यांच्याविरोधतही शिवसेनेने कठोर कारवाई केली आहे. सावंत हेदेखील बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये मुक्कामी होते. याच कारणामुळे तानाजी सावंत यांना सोलापूर संपर्कप्रमुख पदावरुन हटवण्यात आलंय. त्यांच्या जागेवर आता मुंबईतील माजी नगरसेवक अनिल कोकळे यांची सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तानाजी सावंत हे सोलापूर मतदारसंघातील भूम परंडा या मतदारसंघातून आमदार आहेत.

हेही वाचा>>> “मनसेला मंत्रिपद मिळाल्यास विरोध करु,” रामदास आठवलेंनी स्पष्ट केली भूमिका

दरम्यान, शिवसेनेने या कारवाईच्या माध्यमातून आगामी काळात कठोर पावलं उचलली जाणार, याचे संकेत दिले आहेत. आज शिवसेनेच्या खासदारांची उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीविषयीची भूमिका तसेच बंडखोरी आणि सध्याची परिस्थिती यावर चर्चा केली जाऊ शकते. या बैठकीच्या अगोदर शिवसेनेने बांगर आणि तानाजी सावंत यांच्याविरोधात केलेल्या कारवाईला मोठे महत्त्व आले आहे.



Source link

Leave a Reply