बाळासाहेबांना कुटुंबाच्या चौकटीपुरते मर्यादित करू नका – दादा भुसेअलिबाग – बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना मुलगा मुख्यमंत्री व्हावा म्हणून केली नव्हती, तर सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर बसावा ही त्यांची इच्छा होती. ते तमाम शिवसैनिकांचे बाप होते. त्यामुळे त्यांना ठाकरे घराण्याच्या चौकटीपुरते मर्यादित करू नका, असा टोला राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री दादा भुसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला. ते अलिबाग येथे शिवसेना जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत बोलत होते. घरात बसून शिवसेना वाढली नाही तर शिवसैनिकांच्या त्याग, कष्ट आणि समर्पणाच्या वर पक्ष संघटना मोठी झाली अशी कोपरखळी त्यांनी लगावली.

राज्यातील सत्ता स्थापनेनंतर शिवसेनेच्या शिंदे समर्थक गटाने गुरुवारी अलिबाग येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, उपनेत्या शीतल म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी, दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आदी उपस्थित होते.

आम्ही गद्दार असतो तर लोक आमच्या सोबत राहिले नसते. घरातला विषय घरात मिटावा अशी आमची इच्छा होती. उद्धव ठाकरेंची इच्छा व्हायची. पण कोणीतरी येऊन खडा टाकायचे. त्यामुळे विषय टोकाला गेला. जनतेच्या दरबारात चर्चेसाठी या आमची आजही चर्चेची तयारी आहे. मुख्यमंत्रीपदावर असताना उध्दव ठाकरे किती शिवसैनिकांना भेटत होते. आज जे करत आहात ते आधी केले असते तर ही परिस्थिती उद्भवलीच नसती असेही भुसे यावेळी म्हणाले.

शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांनी यावेळी बंडामागील आपली भूमिका यावेळी मांडली. चहावाल्याने दिल्लीत तर रिक्षावाल्याने राज्यात क्रांती केली. ठेचा खाऊनच आम्ही मोठे झालो. पक्षासाठी अनेक केसेसही अंगावर घेतल्या आहे. पक्ष वाढीसाठी झटलो आहे. आमच्या अंगावर येऊ नका शिंगावर घेऊ. बोलताना भान ठेवा. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. आम्ही तोंड उघडले तर अडचण होईल असा इशारा आमदार भरत गोगावले यांनी दिला.

राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही बाहेर पडलो. पक्षनेतृत्वाला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला होता, म्हणून जनतेचा कौल नाकारून त्यांनी महविकास आघाडी स्थापन केली. तीन आमदार सेनेचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. त्यांनी शिवसेनेचे खच्चीकरण सुरू केले. तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता. म्हणून ही वेळ आली. गद्दारी आमच्या रक्तात नाही. आघाडी आम्हाला मान्य नव्हती म्हणून आम्ही बाहेर पडलो, अशी भूमिका आमदार महेंद्र थोरवे यांनी मांडली.

रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या उठावाची खरी सुरुवात माजी खासदार अनंत गिते यांनी केली. श्रीवर्धन येथे पहिला आवाज त्यांनी टाकला, त्यानंतर त्यांना पक्षातून अलिप्त ठेवण्याचे धोरण स्वीकारले गेले, आणि आता तेच गिते आम्हाला बाटलीत बंद करण्याची भाषा करत आहेत असा टोला महेंद्र दळवी यांनी लगावला. जिल्ह्यात राष्ट्रवादी, शेकाप संपत चालली आहे. आपल्याला संधी आहे. अडीच वर्षांत जे झाले नाही ते आता करून दाखवू. अपेक्षाभंग होणार नाही. असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टिटवी ओरडली की अपशकून होतो- शीतल म्हात्रे

किशोरी पेडणेकर यांनी काल मुंबई येथे झालेल्या मेळाव्यात शीतल म्हात्रे यांचा टिटवी असा उल्लेख केला होता. या उल्लेखाचा शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी आज समाचार घेतला. टिटवी ओरडली तर अपशकून होतो, किशोरीताई पेडणेकर यांनी हे लक्षात घ्यावे. शिवसेना कोणाची जहागीर नसल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

Source link

Leave a Reply