बडनेरातील ‘फिशरीज हब’ची मच्छीमारांना प्रतीक्षा

[ad_1]

अमरावती : पश्चिम विदर्भातील गोडय़ा पाण्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी बडनेरा येथे केंद्रीय मत्स्य विकास मंडळाच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या ‘फिशरीज हब’ प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असून हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा विदर्भातील मच्छीमारांना आहे.

सुमारे ४० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येत असून या ठिकाणी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमधील मासे प्रक्रियेसाठी आणले जाऊ शकतील. अमरावतीत मत्स्यव्यवसायाला मोठा वाव असला, तरी सुमारे ४० टक्के मासे खराब होतात. ताजे मासे ग्राहकांपर्यंत सुस्थितीत पोहचावे आणि त्यावर प्रक्रिया करून इतर भागातही त्याची विक्री व्हावी, यासाठी अमरावती महापालिका आणि महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळाच्या संयुक्त सहकार्यातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. अमरावतीच्या शुक्रवार बाजारात फिश मार्केट तर बडनेरा येथे फिशरीज हब तयार करण्यात येत आहे.

अमरावती विभागात लहान आणि मोठय़ा तलावांच्या माध्यमातून मोठा जलसाठा उपलब्ध असला, तरी मत्स्योत्पादनाच्या दृष्टीने या जलसाठय़ाचा वापर अत्यंत कमी आहे. मत्यबिजांची कमतरता आणि योग्य व्यवस्थापनाचा अभाव त्यासाठी कारणीभूत मानला जात आहे. दर्जेदार मत्स्यबोटुकली, स्वयंसाठवणीतून मत्स्यसाठा, योग्य आकाराच्या मासेमारी जाळयाचा वापर, सवोत्तम मासेमारीचे प्रयत्ना तसेच प्रजनन काळात मासेमारीला बंदी असे उपाय राबवणे अत्यंत गरजेचे आहे. मत्स्यबीजांची कमतरता हा विभागाच्या मत्स्योत्पादन विकासाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. अमरावती जिल्ह्यात १५० लाख मत्स्यबीज क्षमतेचे एकमेव मत्स्यबीज उत्पादन केंद्र (हॅचरी)आहे. त्यात ३० लाख क्षमतेचे दोन मत्स्यसंगोपन युनिट आहेत. बहुतांश मच्छीमार आणि मच्छीमार सहकारी संस्था या पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आंध्रप्रदेशातील मत्स्यबीजांवर विसंबून आहेत. इतर राज्यांमधून आणलेली मत्स्यबीजे ही अशुद्धता, तणावग्रस्त वातावरणातील वाहतूक आणि इतर कारणांमुळे पुरेशी उत्पादनक्षम नसतात.

पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पांसह तलावांमधून मासेमारीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर चालतो. या भागातील मत्स्य व्यवसायास बाजारपेठ मात्र स्थानिक पातळीवरच मिळते व त्यामुळे मागणी असूनही पुरवठा होऊ शकत नसल्याने आर्थिक नुकसानही होते. या भागात व्यवसाय न फोफावण्याचे हे मुख्य कारण असून त्यास चालना देण्याकरिता मुंबई व रत्नागिरीच्या धर्तीवर फिश हब महापालिकेने उभारण्याची योजना आखली.

ताज्या, थंड आणि गोठलेल्या आणि मुल्यवर्धीत माशांच्या खाद्य उत्पादनांचा व्यापार, गोदाम, प्रक्रिया, वितरण आणि निर्यात यासाठी अमरावती महापालिका क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसाय हब (फिश फूड हब) मध्ये रुपांतरीत होणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात नोकरीची संधी निर्माण होऊ शकेल. कोंडेश्वर मार्गावर महापालिकेच्या पावणेदोन हेक्टर क्षेत्रात फिश हब उभारण्यात येत आहे. यामध्ये फिश मार्केटसह फिश ड्रेसिंग सेंटर व आईस प्लांट असून ३० घाऊक दुकाने, किरकोळ विक्री दुकाने, प्रत्येकी पाच मेट्रिक टन क्षमतेच्या मासे गोठवण्याच्या खोल्या, साठवणूक तलाव आणि इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

स्थानिक जलाशयातील मासे कोंडेश्वर येथील फिश हबमध्ये आणले जातील. त्यावर आवश्यक ती प्रक्रिया केल्यानंतर विक्रीसाठी खुली करण्यात येतील. हबमध्ये ठोक व किरकोळ विक्री करता येणार आहे. किरकोळ विक्रीकरिता अमरावती शहरातील शुक्रवार बाजार व बडनेरा उपनगरातील सोमवार बाजार येथे मत्स्य बाजार उभारण्यात येत आहे.

फिश हबच्या माध्यमातून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील सुमारे दीड लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने रोजगार उपलब्ध होणार आहे. मत्स्य व्यवसायास यामुळे या भागात चालना मिळणार असून खवय्यांची हौसही पूर्ण होणार आहे. मात्र त्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

निधी मंजूर करूनही काम अपूर्ण

तत्कालीन आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला. पश्चिम विदर्भातील गोडय़ा पाण्यातील मासेमारीला चालना देण्याकरिता व त्याचे मूल्यवर्धन करून चांगला मोबदला स्थानिक मासेमारांना मिळावा याकरिता २०१८ मध्ये राज्य शासनाकडून २३ कोटींचा निधी मंजूर करून महापालिकेला निधी दिला परंतु अद्यापही फिशरीज हब व फिश मार्केटचे काम पूर्ण होऊ शकले नाही, अशी खंत डॉ. सुनील देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *