फळबाग लागवडीसाठी अर्ज करा

संग्रहित छायाचित्र

सोलापूर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२२-२३ साठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे. फळबाग लागवडीची मुदत 31 डिसेंबर 2022 पर्यंत असणार आहे.

वैयक्तिक शेतकरी, वैयक्तिक बांधावर लागवड फळपिके, वनीकरण, फुलझाडे, वैयक्तिक शेतकरी सलग फळबाग लागवड आंबा, चिकू, पेरू, डाळींब, लिंबू, संत्री, सिताफळ, ड्रॅगनफ्रुट, अव्हाकॅडो, केळी, द्राक्ष इत्यादी, वैयक्तिक शेतकरी पडीक जमिनीवर लागवड आंबा, बोर, नारळ, सिताफळ इत्यादी, फुलझाड लागवड गुलाब, मोगरा, निशिगंध यांचा लागवडीमध्ये समावेश होतो.

लाभार्थ्यांनी क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु देय अनुदान फळपिक लागवडीचे निकष विद्यापीठ शिफारसीनुसार अंतर मर्यादेतच देय राहील. अतिरिक्त कलमे/रोपे यांचे अनुदान देय राहणार नाही. लागवड वर्षासह सलग तीन वर्षात मंजूर अंदाजपत्रानुसार अनुदान देय राहील. दुसऱ्या व तिसऱ्यावर्षी बागायती वृक्ष पिकांच्या बाबत जे लाभार्थी कमीत कमी 90 टक्के आणि कोरडवाहू वृक्षपिकांच्या बाबत किमान 75 टक्के रोपे जीवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील.

योजनेंतर्गत खालील फळपिके व फुलपिके यांना अनुदान देय राहील

फळपिके– ड्रॅगनफ्रुट, अव्हाकॅडो, केळी, द्राक्ष, आंबा, चिकू, पेरू, डाळींब, संत्री, सिताफळ, कागदी लिंबु, मोसंबी, आवळा, कवठ, जांभुळ, नारळ, चिंच, फणस, अंजीर, पानपिंपरी, शेवगा, काजू. फुलपिके- गुलाब, मोगरा, निशिगंध.

लाभार्थी निकष

कमीत कमी ०.०५ हे. व जास्तीत जास्त २.०० हे प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील. इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व ७/१२ च्या उताऱ्यावर कुळाचे नाव असेल तर योजना राबवीत असताना कुळाची संमती आवश्यक, अल्प व अत्यल्प लाभार्थी, महिला लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती कुटूंब प्रमुख असलेल्या कुटुंबियांना प्राधान्य. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीस प्राधान्य. शाश्वत उत्पन्नाची साधने नोकरदार व्यक्ती नसावा. पंतप्रधान आवास योजनेला प्राधान्य. ऑनलाईन रोजगार कार्डधारक असावा. जमीन सुधारणा करणारे लाभार्थी, ग्रामसभेची मंजुरी असावी व ग्रामपंचायत लेबर बजेटमध्ये त्याचा समावेश असावा व ग्रामसभेचा ठराव आवश्यक.

निकषात बसणाऱ्या व प्राधान्यक्रम निश्चित करुन ग्रामसभेच्या वैयक्तिक नाव व बाबचा ठराव मंजूर असेल तर सदर लाभार्थ्याचे नमुना ४ मध्ये मागणीच्या आधारे विभागाकडून सविस्तर अंदाजपत्रक बनविण्यात येईल. अंदाजपत्रकाला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीच्या आधारे कार्यारंभ आदेश देऊन नमुना ४ मागणी आधारे हजेरीपत्रक काढण्यात येते व संबंधितांना ते काम पूर्ण करावे लागते. काम पूर्ण झाल्यावर संगणक प्रणालीद्वारे रक्कम संबंधित लाभार्थ्यांचे बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

वैयक्तिक शेतावर व बांधावर वृक्ष लागवड लाभार्थ्यांचे निवडीचे निकष वरीलप्रमाणे राहतील शेतकऱ्याचे वैयक्तिक बांधावर हेक्टरी २० रोपे मर्यादित ही योजना राबविण्यात येते. बांधावर लागवडमध्ये विभागानुसार सर्व फळपिकाचा (पपई सोडुन) समावेश आहे. तसेच सर्व औषधी व सुगंधी वनस्पती, वनीकरणमधील झाडे, वार्षिक फळझाडे जसे शेवगा, हदगा इत्यादीचा ही समावेश आहे.

याचबरोबर शेतीशी संबंधित नाडेप युनिट, गांडूळ युनिट, शेततळे अस्तरीकरणासह बांध बंदिस्ती या योजनेचा लाभही यामधून घेता येतो. यासाठी गावच्या कृषी सहायकाकडे व तालुक्याच्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे मागणी करण्याचे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply