Headlines

amol mitkari on jitendra awhad arrest har har mahadev movie screening



राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या अटकेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जात आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शोदरम्यान ठाण्यात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात संताप व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे सरकारला गंभीर इशारा दिला आहे. अमोल मिटकरींनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्वीट केलं असून त्यामध्ये अप्रत्यक्षपणे मनसेलाही लक्ष्य केलं आहे.

नेमकं घडलं काय?

सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो सुरू होता. या चित्रपटामध्ये शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शो बंद पाडला. यावेळी काही प्रेक्षकांना आव्हाडांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मनसेनं यासंदर्भात टीका केल्यानंतर आव्हाडांविरोधात वर्तकनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली.

राज्यात हुकुमशाही? मिटकरींचा टोला!

दरम्यान, या सगळ्या प्रकाराचा निषेध करताना अमोल मिटकरींनी ट्विटरवर राज्यात हुकुमशाही नांदत असल्याचं म्हटलं आहे. “राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करून या सरकारने परत एकदा या राज्यात हुकूमशाही नांदते आहे याचा प्रत्यय करून दिल्याबद्दल सरकारचे धन्यवाद!” असं मिटकरींनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

विश्लेषण: जितेंद्र आव्हाडांच्या अटकेपर्यंत पोहोचला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद ; नेमकं काय आहे प्रकरण?

दरम्यान, राज्य सरकारवर टीका करतानाच मिटकरींनी अप्रत्यक्षपणे मनसेलाही लक्ष्य केलं आहे. “मुठभर ‘खोप्या’तील ‘देशी’ गुंडांच्या नादाला लागून सरकारने ज्या पद्धतीने हा प्रकार केलाय, त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील”, असा सूचक इशारा अमोल मिटकरींनी दिला आहे. या उल्लेखातून मनसेच्या अमेय खोपकरांनाच मिटकरींनी लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, एकीकडे राष्ट्रवादीकडून या अटकेचा निषेध केला जात असताना या कारवाईविरोधात लढायला आपण तयार आहोत, न केलेला गुन्हा कबूल करणार नाही, असा निर्धार जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवर व्यक्त केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.



Source link

Leave a Reply