अलमट्टीतून तब्बल पावणेदोन लाख क्युसेकचा विसर्ग



सांगली : पश्चिम घाट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला, तरी अद्याप पाण्याची आवक मोठी असल्याने कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून वारणा नदी या हंगामात दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. दरम्यान कोयना, चांदोली आणि राधानगरी या तीनही धरणांतील पाणीसाठय़ात मोठी वाढ झाली आहे. राधानगरी धरण शंभर टक्के भरले असून कोयना, चांदोली धरणातील पाणीसाठय़ातही वेगाने वाढ होत आहे. दरम्यान, नदीपात्रातील विसर्ग वाढल्याने अलमट्टी धरणातील विसर्ग बुधवारी दुपारपासून १ लाख ७५ हजार क्युसेक करण्यात आला आहे.

पश्चिम घाट क्षेत्रात गेले चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ झाली आहे. सांगली, कोल्हापूर परिसरात या नद्या पात्राबाहेर आल्या आहेत. अनेक छोटे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचे दळणवळण ठप्प झाले आहे. कोयना, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याची आवक वाढती आहे. कोयना धरणामध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ५.९६ टीएमसी पाण्याची आवक झाली असून धरणातील पाणीसाठा ७९.११ टीएमसी झाला आहे. चांदोली धरणातील पाणीसाठा आज सकाळी ३१.०५ टीएमसी झाला असून धरण ९१ टक्के भरले आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून पायथा विद्युतगृहाद्वारे व चार वक्राकार दरवाजातून ९ हजार ४४८ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे वारणेचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

राधानगरी धरण शंभर टक्के भरले असून या धरणातील पाणीसाठा ८.३४ टीएमसी आहे. धरणातून प्रति सेकंद ३ हजार २८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Source link

Leave a Reply