Headlines

सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्याची ‍प्रगतीकडे वाटचाल – पालकमंत्री जयंत पाटील – महासंवाद

[ad_1]

प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : दोन वर्षाच्या कालावधीत राज्यासमोरील प्रत्येक आव्हानावर मात करण्याचा, जनतेच्या आशा-आकांक्षा, अपेक्षांवर खरे उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचा शासनाने प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये यशही मिळाले आहे. महाविकास आघाडीचे शासन शेतकरी, सर्वसामान्य माणूस यांना केंद्रबिंदू मानून काम करीत आहे आणि पुढच्या काळातही करीत राहू, अशी ग्वाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत म्हणण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व जिल्हा वासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, खासदार गिरीष बापट, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, पद्मश्री  डॉ. विजयकुमार शहा, शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर आदि मान्यवर उपस्थित होते. 

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा यशस्वी मुकाबला केल्यानंतर आता आपण तिसऱ्या लाटेबरोबर लढत असल्याचे सांगून याचाही मुकाबला यशस्वीपणे करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा आपण सज्ज केली आहे. जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण मोहिम गतीने राबविण्यात आली असून आत्तापर्यंत  92 टक्के लोकांना पहिला डोस तर 73 टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.  15 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना त्यांच्या शाळेत जावून लस देण्यात येत आहे. आत्तापर्यंत  90 टक्के किशोरवयीन बालकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर तसेच 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्याधीग्रस्त नागरिकांना कोविड-19 लसीचा बुस्टर डोस देण्यात येत आहे. ओमायक्रॉन सामुहीक प्रसाराच्या पातळीवर असल्याने माझी आपणा सर्वांना विनंती आहे, कोरोना लसीचा डोस वेळेत घ्या. लसीचे दोन्ही डोस पूर्ण करा. कोरोना प्रतिबंधक वर्तणूक ठेवा, मास्क वापरा, गर्दी टाळा आणि महामारीचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी सहाय्य करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे सक्षमीकरण करण्यास सरकारने प्राधान्य दिले आहे. आपणही जिल्ह्यात यंत्रणा सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला 56 रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत.  नविन 12 प्राथमिक आरोग्य  केंद्रे  व  46  उपकेंद्रे मंजूर झाली आहेत. डीपीडीसी अंतर्गत 23 कोटी रूपये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या नवीन बांधकामासाठी तर 5 कोटीहून अधिक निधी दुरूस्तीसाठी मंजूर केला आहे. आरोग्याबरोबरच शिक्षणालाही सरकारचा प्राधान्यक्रम आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील 176 शाळांमध्ये माझी शाळा-आदर्श शाळा हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू आहे. वर्गखोली बांधकाम व दुरुस्तीसाठी 81  कोटी निधी उपलब्ध करुन घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आनंददायी शिक्षण, ग्रंथालय व विज्ञान प्रयोगशाळा समृध्द करण्यात येत आहे. Building as a Learning Aid  उपक्रम  निवडक शाळांमध्ये CSR फंडातून राबविण्यात येत आहेत. मॉडेल स्कूलच्या दुसऱ्या टप्प्यात 155 शाळा निवडलेल्या आहेत. जिल्ह्यातील दानशूर धनिक, उद्योजक, व्यावसायिक यांनी या उपक्रमासाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

 प्रतिवर्षी बसणाऱ्या महापुराचा तडाका लक्षात घेता आपत्ती निवारण यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला आहे. पुरेशा प्रमाणात बोटींची, अनुषंगीक साहित्याची उपलब्धता करण्यात आली आहे. यामुळे पूरबाधित क्षेत्रात जिवीत हानी होण्यापासून बचाव होईल असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पाटबंधारे विभागामार्फत पूरसंरक्षक भिंती बांधकाम, पुररेषा निश्चिती कामे, विशेष दुरूस्ती कामे  करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिराळा तालुक्यातील वाकुर्डे उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या 908 कोटी 44 लाख रूपयांच्या व्दितीय सुधारीत प्रकल्प अहवालास जलसंपदा विभागाने नुकतीच मंजुरी दिल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, या योजनेमुळे सांगली जिल्ह्यातील 26 हजार हेक्टर व सातारा जिल्ह्यातील  2200 हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ होणार आहे. वारणा पाटबंधारे प्रकल्पाच्या 314 कोटी 40 लाख रूपये किंमतीच्या अर्थसहाय्य प्रस्तावास नाबार्डने मंजुरी दिली असून या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील जवळपास 50 हजार हेक्टर व कोल्हापूर जिल्ह्यातील 38 हजार हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ होणार आहे. जिल्हा परिषदेकडील लघु पाटबंधारे विभागाकडून नवीन बंधारे व तलाव दुरुस्तीची 121 कामे पूर्ण होऊन त्यापासून 1 हजार 576 हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित झाली आहे. जिल्ह्यातील कोणतेही गाव जलसिंचनाशिवाय राहून नये असा प्रयत्न आहे. खानापूर, आटपाडी, तासगाव, जत येथे टेंभूचे क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात 40 शिवभोजन केंद्रे कार्यरत असून या सर्व शिवभोजन केंद्रातून आत्तापर्यंत जवळपास 26 लाख थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. महामारीच्या काळात ही केंद्रे अनेक गोरगरीबांचा आधार बनली आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रामध्ये रक्त तपासणीसाठी मध्यवर्ती रोग निदान केंद्र सुरू केले असून यामध्ये रक्ताच्या 20 प्रकारच्या चाचण्या जागेवरच व 63 प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत केल्या जातात. आजअखेर नागरिकांची सुमारे 40 ते 50 लाख रूपयांची बचत झाली आहे. महापालिका क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ डिजीटल अभ्याससिका सुरू करण्यात आलेली आहे. महापालिकाही माझी वसुंधरा या महत्वांकाक्षी अभियानांतर्गत जनतेच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात पर्यावरण पूरक योजना राबवित आहे. आमराई व काळीखण सुशोभिकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. नेमिनाथनगर येथे चिल्ड्रन पार्क विकसित करण्यात येत आहे. मिरजेतील गणेश तलाव व सांगली येथील काळीखण येथे बोटींग सुरू करण्यात येत आहे. कुपवाड  वारणाली  येथे  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कम्युनिटी हेल्थ सेंटर हे हॉस्पिटल जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने लवकरच सुरू करण्यात येत आहे.

यावेळी त्यांनी विटा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये संपूर्ण देशात स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांक ‍मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त थोर क्रांतीकारक, स्वातंत्र्य योध्दे यांच्या कार्याचे स्मरण ठेवून विविध उपक्रमांनी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करूया, असे आवाहन केले.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस  अधिकारी व अंमलदार यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये  गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त सहाय्यक पोलीस फौजदार अनंतराव गोपीनाथ कुंभार, १५ वर्षे सेवेमध्ये उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक प्राप्त राखीव पोलीस उपनिरीक्षक मनिलाल पवार, पोलिस हवलदार सोमनाथ पवार यांचा गौरव करण्यात आला. ‍विविध गुन्ह्यातील उत्कृष्ट तपास केल्याबद्दल  उपविभागीय पोलीस अधिकारी ‍मिरज अशोक वीरकर, सहाय्यक पोलीस फौजदार महेश अष्टेकर, पोलीस हवलदार सिकंदर तांबोळी, पोलीस नाईक जावेद मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस हवलदार सुनिता धुमाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस नाईक अमोल चव्हाण, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, पोलीस शिपाई विक्रम खोत, अभिजीत माळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल आर. पी. कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, पोलीस नाईक अविनाश लाड, पोलीस हवलदार अनिल खोत, पोलीस शिपाई रोहित बन्ने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, पोलीस हवलदार सुरज मुजावर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपीक जाधव, पोलीस हवलदार बाजी भोसले यांचाही यावेळी विविध गुन्ह्यांची यशस्वी उकल केल्याबद्दल गौरव करण्यात आला.

या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयदादा कडणे आणि पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले.

अटल भूजल योजनेवर आधारीत चित्ररथाचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : ग्रामपंचायत हद्दीत दरवर्षी पडणारा पाऊस त्यापैकी किती पाणी अडविले जातो, किती पाणी जमिनीत मुरते, जमिनीतून नेमके उपसले जाते ते पाणी पिकांसाठी, जनावरांसाठी, मानवी वापरासाठी किती वापरले जाते, एकूण पाण्याची मागणी किती, आजमितीला पाण्याचा पुरवठा किती, एकूण मागणी पूर्ण करावयाची झाल्यास कोणत्या उपायोजना कराव्या लागतील याचा तांत्रिक व सामाजिक पध्दतीने केलेला अभ्यास व त्याची केलेली मांडणी म्हणजेच जल सुरक्षा आराखडा होय. ग्रामपंचायत स्तरावरील महिला व वंचितासह सर्वच घटकांच्या सहभागाने आणि सहमतीने जलसुरक्षा आराखडा तयार करणे हा अटल भूजल योजनेचा सर्वात मोठा भाग आहे. याचीच माहिती दर्शविणाऱ्या चित्ररथाचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते आज हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. हा चित्ररथ वरिष्ठ भूवैज्ञानीक भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा सांगली यांनी तयार केला आहे.

या चित्ररथाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, खासदार गिरीष बापट, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांच्यासह वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी, सहाय्यक भूवैज्ञानिक जयंत मिसाळ, कनिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे, शाखा अभियंता निलेश जाधव, वाहिद शेख, नागनाथ पाटील, अभिजीत शिंगाडे, शेखर अडविलकर, एस. आर. पवार, प्रणित कुंभार, विकास पाटील आदि उपस्थित होते.

00000

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *