ajit pawar slams cm eknath shinde group on dussehra melawa 2022 shivsena



शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं. सरकार कुणाचं? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना मिळालं असलं, तरी अद्याप शिवसेना कुणाची? या प्रश्नाचं मात्र उत्तर मिळू शकलेलं नाही. शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंनी शिवसेना आमचीच असा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण देखील आमचंच असल्याचा दावा देखील केला जात असताना आता शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा दसरा मेळावा कुणाचा? असा वाद सुरू झाला आहे. यासंदर्भात दोन्ही बाजूंनी तशाच प्रकारचे दावे केले जात असताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळासाहेबांच्या एका विधानाची आठवण करून दिली आहे.

दसरा मेळाव्यावरून वाद

शिवसेना आमचीच असा दावा करणाऱ्या शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी देखील परवानगी मागण्यात आली आहे. तसेच, शिंदे गटाकडून सर्व आमदार हे दसरा मेळावा आमचाच होईल, असा दावा करत आहेत. मात्र, त्याचप्रकारे शिवसेनेकडून देखील दावे करण्यात येत आहेत. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील वेळोवेळी दसरा मेळावा आमचाच होईल, असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस नेमकी परवानगी कुणाला देणार? आणि दसरा मेळावा कुणाचा होणार? याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. “सगळ्यांनाच परवानगी मागण्याचा अधिकार आहे. पण वर्षानुवर्ष सगळी महाराष्ट्रातली जनता बघत होती की शिवसेनेची स्थापना जेव्हापासून झाली, तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच सभा तिथे व्हायच्या. बाळासाहेब ठाकरेंनी शेवटी त्याच शिवाजी पार्कच्या मैदानावर सांगितलं होतं की इथून पुढे ही शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चालेल. पण त्यानंतर गेल्या २० जूनपासून ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या आहेत त्या सगळ्यांनी पाहिल्या आहेत”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

भाजपा, शिवसेना आणि मनसे मुंबई महापालिका एकत्र लढणार का? एका वाक्यात उत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“सत्ता हातात असणारे त्यांना हव्या त्याच गोष्टी करतात”

“ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना हव्या त्या गोष्टी करत असतात. या बाबतीत पहिल्यांदा एकाचा कार्यक्रम होईल आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम असं काहीतरी होऊ शकेल. वाद तर घालून चालणार नाही. शेवटी संख्येच्या प्रमाणात जनता कुणाच्या पाठिशी आहे, ते शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतरच लक्षात येईल. निवडणूक झाल्यानंतर कळेलच की कुणाची शिवसेना खरी”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.



Source link

Leave a Reply