आज विधिमंडळ कार्यालयात असताना अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. डागाळलेल्या आमदारांना मंत्री बनवणे अत्यंच चुकीचं असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी पत्रकारांनाही सुनावलं “आहे त्याच बातम्या द्या, उगीच कोणाबद्दल कांड्या पेटवायंच काम बंद करा”, असं ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
“कामाच्या निमित्ताने अनेक आजी-माजी आमदार भेटत असतात. माझ्या फोनमुळे जर इतर पक्षाच्या आमदारांची कामं होत असेल, तर ती आम्ही करत असतो. अशा वेळी राजकारण बाजुला ठेऊन त्यांची कामं करण्याचे काम आम्ही करत असतो. मध्यंतरी यशवंत माने हे दिल्लीला त्यांच्या साखर कारखान्यासंदर्भातील कामासाठी गेले होते. श्रीलंकेत साखर पाठण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला होता. त्यांचाही त्यात कोटा होता. त्यासाठी ते दिल्लीला गेले होते. तेव्हा ते महाराष्ट्र सदनमध्ये होते. त्यावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी माणुसकीखातर त्यांनी त्यांची भेट घेतली. तर लगेच माध्यमांत चुकीच्या अर्थाने बातम्या यायला लागल्या. त्यामुळे माझं तुम्हाला येवढंच सांगणं आहे, की असं करू नका. आहे त्याच बातम्या द्या, उगीच कोणाबद्दल कांड्या पेटवायंच काम बंद करा. बातम्या नक्की सांगा तो तुमचा अधिकार आहे. पण कोणाच्या सांगण्यावरून बातमी तयार करू नका”, असं अजित पवार यांनी पत्रकारांना सुनावलं.
हेही वाचा – “उद्धव ठाकरेंप्रमाणे नितीशकुमारांनीही भाजपाच्या पाठित खंजीर खूपसला”; खासदार नवनीत राणा यांची टीका
दरम्यान, यावेळी त्यांनी मंत्रीमंडळात एकाही महिलेला स्थान न दिल्याने त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा टीका केली. “आपण नेहमीच महिलांना सन्मान देत असतो. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी दिली पाहिजे असं समजतो. आज विधानसभेत ज्या महिला आमदार आहेत. त्यापैकी सर्वात जास्त महिला आमदार भाजपाच्या आहेत. असं असताना एकाही महिलेला मंत्रीमंडळात स्थान न मिळणं हे दुर्दैवी आहे. हा सरळ सरळ महिला वर्गाचा अवमान आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.