अहमदनगर-आष्टी प्रवासी रेल्वे सुरू ; दोन जिल्ह्यांना जोडणारी रेल्वे विकासाची भाग्यरेखा : मुख्यमंत्री



बीड : भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यातील विकासाची अनेक स्वप्ने पाहिली होती. त्यापैकी अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. अहमदनगर ते आष्टी या पहिल्या टप्प्यातील ६७ किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन पहिल्या प्रवासी रेल्वेसेवेचा शुभारंभ झाल्याने गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न सत्यात उतरल्याचे भावोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. बीड व अहमदनगर या दोन जिल्ह्यांना जोडणारी रेल्वे विकासाची भाग्यरेखा ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील नवीन आष्टी रेल्वेस्थानकासह आष्टी ते अहमदनगर दरम्यान डेमू सेवेचे उद्घाटन बीड जिल्ह्यातील आष्टी येथे शुक्रवारी झाले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते, तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रीतम मुंडे आणि सुजय विखे पाटील, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

विकास प्रकल्पांबाबत मुंडेंची दूरदृष्टी होती. या रेल्वेमार्गासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पहिल्या टप्प्यातील रेल्वे सेवा सुरू होत असल्याबद्दल मला आनंद असून यापुढे बीड- परळी रेल्वे मार्गाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करू असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे हे सरकार ‘डबल इंजिन’ आहे. त्यामुळे विकास जोरदार होईल,असे ते म्हणाले.

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्राने दोन हजार कोटींचा निधी दिला. त्यापैकी अठराशे कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात मिळाले आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत दिलेल्या १४०० कोटींपैकी ११७५ कोटींचा निधी भाजप सरकार असताना देण्यात आला. दर तीन महिन्यांनी मी स्वत: यामध्ये लक्ष घालत होतो. महाविकास आघाडी सरकारने अनेकवेळा प्रकल्पांना महत्त्व दिले नाही. निधी देण्यासही नकार दिल्याने हा प्रकल्प लांबल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे सरकारने मात्र सत्ता स्थापनेनंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता मिळवून देत २५० कोटींचा निधी दिला. आतापर्यंत केंद्र सरकारच निधी देत होते. मात्र आता राज्य सरकारही सोबत आहे. रेल्वे गाडीला आता डबल इंजिन मिळाल्याने बीड, परळीपर्यंतचे काम जलदगतीने होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

या रेल्वेसेवेमुळे बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा आधार मिळणार असल्याचे सांगतानाच, मार्च २०२३ पर्यंत या रेल्वे मार्गाचे बीडपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल अशी हमी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. या रेल्वेमार्गाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते. लोकसभा निवडणुकीवेळी बीडमध्ये असताना या रेल्वे मार्गासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पाळले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पहिल्या दिवशी..

बहुप्रतीक्षित अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील आष्टीपर्यंत ६७ किमीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर नवीन आष्टी ते अहमदनगर डेमू सेवेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. पहिल्या दिवशी २४२ प्रवाशांनी प्रवास केला. आष्टीतील व्यापारी प्रीतम बोगावत हे पहिले तिकीट घेणारे प्रवासी ठरले.

निधी कमी पडू देणार नाही..

गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने भरघोस निधी दिला आहे. बीड आणि परळीपर्यंत रेल्वेमार्गाच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून युध्दपातळीवर प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Source link

Leave a Reply