कृषी पंप वीज थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरल्यास वीज बील कोरे होणार –  पालकमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद


स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्यसेनानीच्या त्यागापासून स्फूर्ती व प्रेरणा घ्यावी

जिल्हा लसवंत करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःहून लस घ्यावी, 85 टक्के नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर 28 हजार 400 बेडची उपलब्धता

190 मेट्रिक टन ऑक्‍सिजन निर्मिती, ऑक्सिजन निर्मितीमध्ये जिल्हा स्वयंपूर्ण

माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू

स्वच्छ शाळा, सुंदर शाळा अभियानात लोकसहभागातून 2560 शाळांचे अद्यावतीकरण

सोलापूर, दि. 26(जिमाका):- महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर रहावे म्हणून ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषीपंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नविन कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 जाहीर केलेले आहे. यानुसार कृषीपंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात येत असून, थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास वीज बील कोरे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, वने राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री श्री. भरणे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, शहर पोलीस आयुक्त हरीश बैजल, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, कृषी सभापती अनिल मोटे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भरणे पुढे म्हणाले की, भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय राज्यघटना ज्या समितीने तयार केली त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमध्ये बहुमोल योगदान लाभले. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या भारत देशाने 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो.

तसेच देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत. यानिमित्ताने आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू असोत वा तात्या टोपे, क्रांतिसिंह नाना पाटील असो. सोलापूरातील अब्दुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदे यांनीही स्वांतत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण स्वातंत्र्यसेनानींच्या त्यागापासून स्फूर्ती व प्रेरणा घ्यायला हवी, असे आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केले.

अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन आणि विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने वळसंग येथे महाशिबीराचे आयोजन करून नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली. तसेच कायद्याविषयी प्रबोधन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. नगरपालिका क्षेत्रातील रमाई आवास योजनेच्या 75 लाभार्थ्यांना 55 लाखांच्या निधीचे वितरण करण्यात आले. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्ह्यातील 75 हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी राष्ट्रगीत गाऊन आजादीचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली.

 मागील तीन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीला सामोरे जात आहे. आपल्या राज्यासह देशात ही सद्यस्थितीमध्ये ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार होत आहे. आरोग्य यंत्रणेनुसार देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. मागील दोन लाटेत कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने चांगले काम केले असून या तिसऱ्या लाटेतही प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासन व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन श्री. भरणे यांनी केले.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेंअंतर्गत लसीकरण ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे. प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून आपला जिल्हा लसवंत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. आपल्या जिल्ह्याचे लसीकरणाचे उद्दिष्ट 34 लाख 14 हजार चारशे इतके असून आजपर्यंत पहिला डोस 85 टक्के नागरिकांनी तर दुसरा डोस 55 टक्के नागरिकांनी घेतला आहे. अजूनही सुमारे 5 लाख नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही. त्यातील 18 ते 45 वयोगटातील नागरिकांची संख्या अंदाजे 60 टक्केपर्यंत आहे. 18 ते 45 वयोगटातील नागरिकच मोठ्या प्रमाणावर बाहेर फिरतात. ते कोरोनाबाधित झाल्यास संपूर्ण कुटुंबाला संसर्ग होण्याची शक्यता असते. बाहेर फिरणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी महाविद्यालयस्तरावरून 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण झाले पाहिजे, यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व मेंटर्स यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून त्यांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच 15 ते 18 वयोगटातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांचेही लसीकरण सुरू झाले असल्याची माहिती पालकमंत्री भरणेे यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी 28 हजार 400 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये 3 हजार 175 ऑक्सिजनचे तर 1 हजार 279 आयसीयु आणि 365 व्हेंटिलेटर बेडचाही समावेश आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण झाला आहे. दुसऱ्या लाटेत सर्वोच्च मागणी 63 मेट्रीक टनची होती, मात्र सोलापूर जिल्ह्यात 190 मेट्रीक टन म्हणजे तिप्पट ऑक्सिजन निर्मिती होत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचेे पालकमंत्री भरणे यांनी सांगून कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने प्रत्येकी 50 हजाराचे अर्थसाह्य देण्यात येत असून सोलापूर जिल्ह्यात एकूण 10 हजार आठशे एक अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर त्यातील 3 हजार 517 अर्ज मंजूर झालेले असून मंजूर झालेल्या अर्जदाराच्या बँक खात्यावर थेट पन्नास हजाराचे अनुदान देण्याची कार्यवाही सुरू आहे. कोरोना काळात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने दिलासा देण्याचा हा एक प्रयत्न असल्यााचे त्यांनी सांगितले.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन राबवून हातभट्टीची दारू विकणाऱ्या आणि बनविणाऱ्या व्यक्तींना त्यापासून परावृत्त करून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. हातभट्टीवर उपजिविका असणाऱ्या 600 कुटूंबापैकी 326 कुटूंबाचे पुनर्वसन केले. ही कुटूंबे पशुपालन, शेती आणि लघुउद्योग करीत आहेत. तसेच राज्यात मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित “माझी वसुंधरा” अभियान 2.0 ची सुरुवात झाली आहे. अभियानात आपल्या जिल्ह्यातील महापालिका, 12 नगरपरिषदा व 4 नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांनी भाग घेतला आहे. अभियानाच्या जनजागृतीसाठी 432 उपक्रम राबविण्यात आले. सर्वच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियमितपणे  जनसहभागातून स्वच्छता मोहीम, प्लास्टिक संकलन मोहीम, वृक्षारोपण व संवर्धन, पाणवठे व विहिरी स्वच्छता मोहीम, शालेय स्पर्धा सायकल रॅली हे उपक्रम कोरोनाच्या नियमांचे पालन करून घेतलेले आहेत, अशी माहिती श्री भरणे यांनी दिली.

मागील वर्षभरात सोलापूर जिल्हा परिषदेने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याचा नावलौकिक राज्यभरात वाढवलेला आहे. “माझे गाव कोरोना मुक्त गाव” हे अभियान तर शासनाने स्वीकारले असून त्याची राज्यभर अंमलबजावणी सुरू केली. “माझे मुल माझी जबाबदारी” हे अभियान राबवून 9 लाख मुलांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांचे हेल्थ कार्ड तयार केले आहे तर त्यातील 45 मुलांच्या अति दुर्धर आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान दिले आहे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने “मी सुरक्षित माझा गाव सुरक्षित” हे अभियान सुरू केले असून तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अभियानात लोकसहभागातून आठ कोटीचे कामे झाली असून 2560 शाळा स्वच्छ सुंदर व अद्यावत करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्या असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या नागरी भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. सोलापूर महानगरपालिकेला नागरिकांना पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी 28 कोटी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 33 कोटीचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याच्या इतर नागरी भागासाठीही त्यांच्या मागणीनुसार निधी मंजूर करून नागरी भागाच्या विकासाला चालना देण्यात येत आहे. यावर्षी वन विभाग शहरासह पालखी तळाजवळ मियावाकी पद्धतीने रोपवन लागवड करणार आहे. सिद्धेश्वर वनविहार येथे प्रथमच वन्यजीवांसाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारले जात आहे. 400 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड केली जाणार असून 34 वे राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन सोलापुरात पार पडले, असे श्री भरणे यांनी सांगितले.

खरीप हंगाम 2021 मध्ये दोन लाख 22 हजार शेतकऱ्यांनी एक लाख 73 हजार हेक्टर पिकाचे विमा संरक्षण करून घेतले होते. स्थानिक आपत्तीत विमा कंपनीने निकष पूर्ण करणाऱ्या 98 हजार 164 शेतकऱ्यांना 68 कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून वितरित केलेले आहेत. डाळिंब, द्राक्षे आणि केळीची आंतरराष्ट्रीय निर्यात वाढल्याने बळीराजाला फायदेशीर होत आहे, अशी माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली.

विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक,वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात चांगली प्रगती करीत आहे. जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही श्री. भरणे यांनी देऊन भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन निमित्त ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, कोविड योद्धे व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भारतीय राज्य घटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले त्यानंतर त्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. या समारंभास उपस्थित सर्व मान्यवरांची भेट घेऊन त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

**********

Source link

Leave a Reply