अफजलखान कबरीजवळील अतिक्रमणावर हातोडा; मोठय़ा बंदोबस्तात बेकायदा बांधकामावर कारवाईवाई : साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीचे मूळ ऐतिहासिक बांधकाम वगळून उर्वरित बेकायदा बांधकाम गुरुवारी पहाटे मोठय़ा पोलीस बंदोबस्तात हटविण्यास सुरुवात करण्यात आली. राज्य सरकारने गोपनीयता राखत शिवप्रताप दिनी ही कारवाई केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचे मूळ थडगे अगदी छोटय़ा स्वरूपाचे होते. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याच्याभोवती नव्याने मोठे बांधकाम, राहण्यासाठी खोल्या बांधण्यात आल्या. या स्थळावर अफझलखानाचा उरुसही भरवण्यात येऊ लागल्याने अनेक हिंदूत्ववादी पक्ष- संघटनांकडून आंदोलने सुरू झाली होती. हे अवैध बांधकाम वन विभागाच्या हद्दीत असल्यामुळे राज्य शासनासह अनेक संघटना याविरुद्ध न्यायालयातही गेल्या. या वादामुळे २००६ पासून हा संपूर्ण परिसर नागरिकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला. २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या भागात करण्यात आलेली सर्व बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निकालानंतरही ही कारवाई प्रलंबित होती. ती करण्याची वारंवार मागणी केली जात होती. अखेर शिवप्रतापदिनीच शिंदे-फडणवीस सरकारने ही कारवाई करत हे अवैध बांधकाम हटवले.

प्रचंड बंदोबस्त, तणाव, शांतता

राज्य शासनाच्या वतीने बुधवारी रात्रीपासून अतिशय गोपनीयता राखत ही कारवाई करण्यात आली. यासाठी परिसरात दोन हजारांहून अधिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साताऱ्यासह शेजारील जिल्ह्यातील पोलिसांची कुमक मागवण्यात आली होती. बुधवारी रात्रीपासूनच महाबळेश्वर प्रतापगडकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. ही कारवाई करताना कुठेही कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी साताऱ्यासह लगतच्या जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. प्रतापगड परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. माध्यम प्रतिनिधींनाही परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

दरम्यान, गुरुवारी पहाटेपासून प्रत्यक्ष कारवाईस सुरुवात करण्यात आली. त्यासाठी मनुष्यबळासह जेसीबीची मदत घेतली जात आहे. ही कारवाई पुढील एक दिवस सुरू असणार असल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत बेकायदा बांधकाम पाडण्याबाबत नियोजन करण्यात आले. गुरुवारी सकाळपासून हे बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी मोठे व पक्के बांधकाम झाले असल्याने ते पाडण्यास वेळ लागत आहे. सायंकाळपर्यंत मोठे बांधकाम पाडण्यात आले.

– रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, सातारा

अफझलखान वधाच्या दिनीच जावळी खोऱ्यातील शिवप्रताप भूमी मुक्त करण्याचे काम होत आहे. गेली २० वर्षे सुरू असलेल्या शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या लढय़ाला हिंदूत्ववादी सरकारच्या भूमिकेमुळे यश आले.

– नितीन शिंदे, माजी आमदार, निमंत्रक, शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन

कार्यकर्त्यांचा जल्लोष

प्रतापगड (ता महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीजवळील अवैध बांधकाम पाडल्यावर प्रतापगड उत्सव समिती व हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात गुरुवारी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठय़ा उत्साहात आतषबाजी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला.

Source link

Leave a Reply