आता पांढऱ्या कांद्याच्या बियाण्यांची सीडबॅंक ; कृषी विभागाचा पुढाकार, बियाण्यांची टंचाई दूर होणार



अलिबाग – अलिबागच्या वैशिष्टय़पूर्ण पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. असे असले तरी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेगळीच समस्या भेडसावते आहे. मागील वर्षी झालेल्या पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने यंदा बियाण्याचा मोठा तुटवडा भासतो आहे. भविष्यात शेतकऱ्यांना बियाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी पांढऱ्या कांद्याची सीडबँक सुरू करण्याची कृषी विभागाची योजना आहे.

पांढऱ्या कांद्याची शेती अद्यापही पारंपरिक पद्धतीने केली जाते आहे, यात विशेष बदल झालेला नाही. पुढल्या वर्षांच्या लागवडीसाठी येणाऱ्या पिकामधून बियाणे बाजूला ठेवले जाते. हे बियाणे जास्त प्रमाणात जमा होत नाही. कांद्या पातीला येणाऱ्या बोंडामध्ये हे बी तयार होते, ते काढल्यानंतर ते जपून ठेवावे लागते. थोडय़ाशा हलगर्जीपणामुळे ते अनेकवेळा खराब होते. गेल्यावर्षी अचानक आलेल्या पावसाने हे बियाणे वाया गेलेले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना बियाणाचा तुटवडा जाणवतो आहे.

अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळा, वाडगाव यासारख्या गावांमध्ये फक्त २३० हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. बियाणाची कमतरता यामुळे हे क्षेत्र लगेचच वाढविण्यावर मर्यादा येत असल्याने कृषी विभागाने सीडबॅंकेच्या माध्यमातून बियाणे जमवून नव्याने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे देण्यात येणार आहेत. यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचा प्रयत्न कृषी विभागाचा आहे. जीआय मानांकन मिळाल्यानंतर कृषी विभागाने पांढरा कांदा लागवडीचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला असून याची सुरुवात येत्या हंगामापासून होणार आहे. अलिबाग तालुक्यात पिकणारा ‘कांदा’ त्यातील औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे, मात्र अलिबागच्या कांद्याच्या नावावर इतर जिल्ह्यातून येणाऱ्या पांढऱ्या कांद्याची विक्री केली जात होती. अलिबागच्या या पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन मिळाल्याने बाहेरच्या शेतकऱ्यांना ही विक्री करता येणार नाही. अलिबाग तालुक्यातील जीआय मानांकनासाठी नोंदणी झालेल्या १४ गावांतील ३५० शेतकऱ्यांना तयार होणारा सफेद कांदाह्ण हा या मानांकनाखाली विकता येईल.

बीजवाढीसाठी सीडबॅंक

अलिबागमधील खारट, दमट हवामानामुळे पांढऱ्या कांद्याचे गुणधर्म अद्याप मूळस्थितीत आहे. या कांद्याच्या लागवडीचे ऐतिहासिक दाखलेही १८८३ सालच्या कुलाबा राजपत्रात पाहायला मिळतात. गुणवत्ता सांभाळण्यासाठी येथील शेतकरी आपल्याच शेतातील बीज काढून पुढील वर्षांकरिता लागवडीसाठी ठेवतात. हे बीज कमी असल्याने लागवडीखालील क्षेत्राला मर्यादा येतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लागवड करता यावी यासाठी कृषी विभागाच्या पुढाकारातून पांढऱ्या कांद्याची सीडबॅंक सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शास्त्रीय पद्धतीने लागवड करण्यासाठी संशोधनही करता येणार आहे.

मागच्या वर्षी मध्येच पाऊस पडल्याने पांढऱ्या कांद्याचे बियाणे खराब झाले होते. त्यामुळे यावर्षी आम्हालाच बियाणे कमी पडणार आहे, अनेक शेतकरी बियाणे मागण्यासाठी येतात, परंतु तुटवडा असल्याने देता येत नाही. भविष्यात बियाण्याची मोठी कमतरता भासणार आहे. हे लक्षात घेऊन कृषी विभागाने यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी

Source link

Leave a Reply