Headlines

“आता ज्यांना एकनाथ शिंदेंचे विचार ऐकायचे आहेत त्यांनी…”, दसरा मेळावा निकालानंतर अजित पवारांचं वक्तव्य | Ajit Pawar comment on Eknath Shinde supporter and Dasara Melava

[ad_1]

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली. हा निर्णय शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मागील अनेक दिवसांपासून शिंदे गटानेही शिवाजी पार्कसाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली दिसत होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “आता ज्यांना शिवसेना शिंदे गट म्हणून एकनाथ शिंदेंचे विचार ऐकायचे आहेत त्यांनी बीकेसीला जा,” असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. ते शुक्रवारी (२३ सप्टेंबर) माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “आता ज्यांना शिवसेना शिंदे गट म्हणून एकनाथ शिंदेंचे विचार ऐकायचे आहेत त्यांनी बीकेसीला जा. ज्यांना उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायचे आहेत त्यांनी शिवाजी पार्कवर जा.”

“मला फक्त काळजी माध्यमांची आहे”

“मला फक्त काळजी माध्यमांची आहे. एकाचवेळी सभा सुरू झाली तर अर्धे इकडे, अर्धे तिकडे होऊन कुणाला दाखवायचं हा प्रश्न येईल. अर्थात माध्यमं त्यात तरबेज आहेत. आम्ही कालही बघितलं. दिल्लीची सभा दाखवायची की इकडची सभा दाखवायची असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यातून माध्यमं मार्ग काढू शकतात,” असं अजित पवारांनी म्हटलं.

“शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायचे आहेत”

निकालावर बोलताना अजित पवार म्हणाले, “बीएमसीमधील जागा एकनाथ शिंदे गटाला देण्यात आली होती. तेव्हाच मी म्हटलं होतं की आता शिवाजी पार्कची जागा ठाकरे गटाला द्यावी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली आहे. ही परंपरा शिवसैनिकांना हवी आहे. शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायचे आहेत.”

“बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं माझ्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख”

“बाळासाहेब ठाकरेंनी हेही सांगितलं होतं की माझ्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख म्हणून काम बघतील. तुम्ही सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभं राहा. त्यावेळी मी म्हटलं होतं की मनपाने परवानगी दिली तर ठीक आहे, नाही तर न्यायालयात जाऊन परवानगी घ्यावी लागेल,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : “…म्हणून उद्धव ठाकरे अमित शाहांना शेवटपर्यंत फोन करत होते”, एकेरी उल्लेख करत नारायण राणेंचा गंभीर आरोप

“निकालाने शिवसैनिकांच्या मनातही उत्साह संचारला”

“देशात कुठेच न्याय मिळाला नाही, तर शेवटी आपण न्यायालयात जातो. न्याय व्यवस्था न्याय देते. अशाप्रकारे शिवसेनेला न्याय मिळाला आहे. त्याबद्दल मी मनापासून समाधान व्यक्त करतो. निरपेक्ष पद्धतीने हा न्याय मिळाला आहे. या निकालाने शिवसैनिकांच्या मनातही उत्साह संचारला असेल,” असंही पवारांनी नमूद केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *