Headlines

“३१ जुलैला मी राजीनामा देणार”; एकनाथ शिंदे गटातील आमदाराने स्वीकारलं आदित्य ठाकरेंचं ‘ते’ चॅलेंज | Eknath Shinde Group MLA Abdul Sattar Says will resign on 31st july and get reelected by accepting Aditya Thackeray challenge scsg 91



शिवसेनेचे सिल्लोडचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं आहे. सत्तार यांनी आदित्य यांच्या आव्हानानुसार ३१ जुलैला राजीनामा देणार असल्याची माहिती दिली आहे. सध्या नवी दिल्लीमध्ये असणाऱ्या सत्तार यांनी आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेदरम्यान आमच्या जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये आले मात्र माझ्या मतदारसंघात आले नाहीत असंही म्हटलंय.

नक्की वाचा >> शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? सत्तारांनी थेट शपथविधीची तारीखच सांगितली; म्हणाले, “अंतिम यादी…”

“मी ३१ जुलैला राजीनामा देणार. मी तर हे नक्की केलेलं आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी परवानगी नकारल्यास काही करता येणार नाही,” असं सत्तार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय. “मुख्यमंत्र्यांना राज्य चालवायचं आहे. त्यांना ५० आमदारांचा विचार करायचायत, राज्य चालवायचं आहे. मात्र राजीनाम्यासंदर्भात मी माझं मत स्पष्टपणे त्यांच्यासमोर मांडणार आहे,” असं सत्तार यांनी म्हटलंय. तसेच आपल्या मतदारसंघामध्ये इतकी विराट सभा घेणार आहोत की महाराष्ट्रात कुठेही एवढी मोठी सभा झालेली नसेल, असंही सत्तार म्हणालेत.

मागील अनेक दिवसांपासून आदित्य ठाकरे त्यांच्या सभांमध्ये बंडखोर आमदारांचा गद्दार असा उल्लेख करत टीका करताना दिसत आहेत. त्यांनी अनेकदा या आमदारांना आव्हान देताना राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा, असंही म्हटलं आहे. आदित्य यांचं हेच आव्हान आपण स्वीकारत असल्याचं सत्तार याचं म्हणणं आहे.

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा संदर्भ देत सत्तार यांनी ते माझ्या मतदारसंघामध्ये आले नाहीत असं म्हटलं आहे. मतदार वाटत पाहत होते त्यांची असंही सत्तार यांनी म्हटलंय. “आदित्यसाहेब आले. पण ते माझ्या मतदारसंघात नाही आले. त्यांची वाट पाहत होते मतदार. ते जिल्ह्यात आले पण माझ्या मतदारसंघात आले नाही. तिथे एकूण पाच आमदार शिंदेंसोबत आहेत. त्यापैकी चार आमदारांच्या मतदारसंघात ते जाऊन आले. माझ्या मतदारसंघात आले नाहीत. कदाचित त्यांचा यामागे काही वेगळा विचार असेल तर मला ठाऊक नाही,” असं सत्तार म्हणाले आहेत.

मंत्रीमंडळ विस्तार लवकरच…
सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये खातेवाटप आणि मंत्रीपदांसंदर्भातील वाटपाबद्दल अंतिम बोलणी पूर्ण झाल्याचा दावा केलाय. “कोणाला किती खाती मिळणार वगैरे ही वाटाघाटी झालेली आहे. मात्र अंतिम निर्णय झालेला नाही,” असं सत्तार यांनी म्हटलं आहे. “मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली असून अंतिम यादीही तयार आहे. दिल्लीमधील वरिष्ठ नेते ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत त्यांनी विचारविनिमय केलेला आहे. त्यावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होईल,” असं सत्तार म्हणालेत.



Source link

Leave a Reply