चार वर्षात एसटी अपघातात १३२ प्रवाशांचा मृत्यू | 132 passengers died in ST accidents in four years mumbai print news msr 87



मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये एसटी बसच्या अपघातात चालक, वाहकासह दहा प्रवाशाचा मृत्यू झाला. या अपघातात चालकाची चूक नसली तरीही एसटीत होणारे अपघात, वाहतूक नियमांना दिली जाणारी तिलांजली इत्यादी मुद्दे ऐरणीवर आले आहेत. गेल्या चार वर्षांत एसटीच्या बसगाड्यांच्या अपघातात १३२ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. तर गेल्या तीन वर्षांमध्ये महामंडळाला अपघातग्रस्त एसटीतील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम द्यावी लागली आहे.

राज्यात विविध ठिकाणी एसटीच्या बसगाड्यांचे अपघात चालकाच्या किंवा अन्य वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात. या अपघातांमध्ये एसटी प्रवाशांना जीव गमावावा लागतो किंवा गंभीर दुखापत होते. २०१८-१९ पासून २०२१-२२ पर्यंत एकूण १००३ प्राणांतिक अपघात झाले. यामध्ये एकूण १३२ एसटी प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये अनुक्रमे ३७७ आणि ३६० प्राणांतिक अपघात झाले होते. त्यानंतर करोना आणि लागू झालेल्या कडक निर्बंंधांमुळे अपघातांची संख्या कमी झाली. २०२०-२१ मध्ये १३६ आणि २०२१-२२ मध्ये १३० अपघातांची नोंद एसटी महामंडळाकडे झाली. २०२१-२२ मध्ये १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

११२ कोटींची नुकसान भरपाई –

अपघातग्रस्त एसटीतील जखमी किंवा मृतांच्या वारसांना एसटी महामंडळाकडून नुकसान भरपाई किंवा आर्थिक मदत दिली जाते. गेल्या तीन वर्षांत ११२ कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाई अदा करण्यात आली आहे. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशाला झालेल्या जखमांच्या स्वरुपानुसार तत्काळ मदत म्हणून ५०० ते १००० रुपये, मृतांच्या नातेवाईकांना १० हजार रुपये दिले जातात. त्यानंतर सर्व कायदेशीरबाबी पूर्ण करून प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याचे वारस किंवा नातेवाईकांना १० लाख रुपये, कायमस्वरुपी विकलांग होण्याची शक्यता असलेल्या जखमी प्रवाशाला पाच लाख रुपये, अंशत: विकलांगता येण्याची शक्यता असलेल्या जखमी प्रवाशाला अडीच लाख रुपये आणि तात्पुरता विकलांग झालेल्या जखमीला एक लाख रुपये मदत रुपात देण्यात येतात.

ऑगस्ट २०१९ मध्ये औरंगाबाद ते शहादा मार्गावर झालेल्या अपघातांत ११ प्रवाशांचा मृत्यू आणि ३५ प्रवासी जखमी झाले होते. तर जानेवारी २०२० मध्ये धुळे – कळवण मार्गावरील बसला झालेल्या अपघातांत १७ प्रवाशांचा मृत्यू आणि ३४ प्रवासी जखमी झाले, तर अन्य वाहनातील ९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.



Source link

Leave a Reply