Headlines

नंदुरबारमध्ये अडीच वर्षांत १० हजार मुलींचा बालविवाह

[ad_1]

नीलेश पवार, लोकसत्ता

नंदुरबार : कुपोषणग्रस्त नंदुरबार जिल्ह्यात अडीच वर्षांत नऊ हजार ९८३ मुलींचा बालविवाह झाल्याचे उघड झाले आहे. यातील २३०५ मुली १८ वर्षांच्या आतच गर्भवती होऊन एक किंवा दोन मुलांच्या माता झाल्या आहेत. व्यापक जनजागृती मोहीम राबवून बालविवाह थांबत नसल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. 

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कुपोषणावरून सर्वपक्षीय सदस्यांनी व्यापक चर्चा करत जिल्ह्याला लागलेला कुपोषणाचा डाग कमी करण्यासाठी प्रभावी पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली. काँग्रेसचे सुहास नाईक, राया मावची आणि प्रताप वसावे यांनी तर, भाजपकडुन ऐश्वर्या रावल, संगीता गावीत यांनी विविध योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित केली. कुपोषणाच्या कारणांवरील चर्चेत बालविवाह हे प्रमुख कारण असल्याचे उघड झाले.

जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने या अनुषंगाने फेब्रुवारीत सर्वेक्षण केले होते. जिल्हा परिषद सदस्या संगीता गावीत यांनी नवापूर तालुक्यातील १३ वर्षांची एक मुलगीही माता झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. प्रशासनाने जवळपास ५२ हजार ७७३ महिलांचे सर्वेक्षण केले होते. यातून ही आकडेवारी समोर आली. एकूण महिलांचा विचार करता बालविवाह झालेल्या महिलांची टक्केवारी १८.९६ असून १८ वर्षांच्या आतील माता झालेल्या महिलांचा आकडा हा ४.३७ टक्के आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सभागृहाला याबाबत विचार करण्याची गरज असून सामाजिक स्तरावर व्यापक जनजागृतीची आवश्यकता मांडली. मुलींची योग्य शारीरिक वाढ झाली नसताना विवाह झाल्यास बालकेदेखील कुपोषित राहतात. याबाबत यंत्रणा आणि राजकीय मंडळींनी एकत्रित काम करण्याची गरजदेखील त्यांनी व्यक्त केली. खुद्द गावडे यांनी १० कुपोषित मुले दत्तक घेण्याची तयारी दर्शवली. कुपोषणाचा कलंक हटवण्यासाठी नवापूर तालुक्यातील सारेच जिल्हा परिषद सदस्य पुढाकार घेण्यास तयार असून यातील प्रत्येक जण प्रत्येकी १० कुपोषित बालकांचे पालकत्व स्वीकारण्यास तयार असल्याचे भरत गावीत यांनी सभागृहात सांगितले.

२,३०५ अल्पवयीन माता

अडीच वर्षांत ९,९८३ मुलींचा बालविवाह झाला. त्यापैकी २,३०५ मुली अल्पवयीन होत्या. अल्पवयातच त्या एक किंवा दोन मुलांच्या माता झाल्या. त्यांची योग्य शारीरिक वाढ झाली नसल्याने त्यांची बालकेही कुपोषित राहतात.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *