Headlines

सीना नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहतुकीसाठी होणार बंद

1 ऑगस्टपासून नवीन पुलाचा वापर करण्याचे आवाहन
सोलापूर, दि. 15 : नवीन घोषित राष्ट्रीय महामार्ग क्र.548 वर सीना नदीवर असलेला ब्रिटीशकालीन दगडी पूल 100 वर्षांपेक्षा जुना झाला असल्याने वाहतुकीला धोकादायक बनत आहे. यामुळे 1 ऑगस्ट 2020 पासून या पुलावरून होणारी वाहतूक कायमस्वरूपी पूर्णपणे बंद ठेवण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
मायणी-म्हसवड-माळशिरस-टेंभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-येडशी-ढोकी-मुरूड-लातूर-सोनवती-मुशिराबाद-शिरूर-अनंतपाळ-तळेगाव-देवणी-लासोना या राज्य सीमा मार्गावर टेंभुर्णी-कुर्डुवाडी-बार्शी दरम्यान सीना नदीवर 158 मीटर लांबीचा ब्रिटीशकालीन दगडी पूल आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी ब्रिटीशकालीन दगडी पुलाजवळच दुसरा नवीन पूल बांधण्यात आला असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ब्रिटीशकालीन पुलाच्या दोन्ही बाजूला माहितीफलक, गतीरोधक, दिशादर्शक फलक लावण्यात आले असून वाहनधारकांनी नवीन पुलाचा वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply