Headlines

विनाकारण फिरणाऱ्याला 500 रूपये दंड वापरलेले वाहन पोलीस घेणार ताब्यात जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

 

 

सोलापूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. ब्रेक द चैनअंतर्गत संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्द वगळून जिल्ह्यात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना 500 रूपये दंड आणि वापरत असलेले वाहन लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत ताब्यात घेण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना करीत आहे. तरीही ग्रामीण भागातील नागरिक विनाकारण फिरत आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर आपत्ती व्यवस्थापन बंदोबस्त/नाकाबंदी लावण्यात आली आहे. होमक्वारंटाईन कोरोनाबाधित रूग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी कोविड टेस्टिंग रूग्णालये, प्रयोगशाळा, हॉटस्पॉट गावे, हाय अलर्ट गावे याठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

या आदेशात नमूद करण्यात आल्यानुसार पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळून जिल्ह्यात कोणताही नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय फिरत असल्याचे आढळून आल्यास 500 रूपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही पोलीस प्रशासनाला दिले आहेत. शिवाय अत्यावश्यक कामाशिवाय फिरण्यास वापरलेले वाहन लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत ताब्यात घेण्याचे आदेशही पोलीस प्रशासनाला श्री. शंभरकर यांनी दिले आहेत.

आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 188 मधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *