Headlines

मी ही रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी करीन.

मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण रमजान ईद ही एका दिवसावर येऊन ठेपली आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे देशभरात लागू असलेल्या लॉक डाऊन मुळे ही ईद घरातच साजरी होणार आहे. ही ईद घरातच साजरी करा तसेच साधेपणाने साजरी करा असा समाज माध्यमांवर ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ ‘ या संस्थेचा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे. मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे राज्यभरातून व सर्वस्तरातून प्रचंड स्वागत होत आहे.

मुस्लिम सत्यशोधक मंडळ ही समाजसेवी संघटना महाराष्ट्रात गेल्या पन्नास वर्षांपासून प्रबोधनाचे तसेच लोकशिक्षणाचे काम करत आहे. यंदा लॉक डाऊन मुळे ईद सार्वजनिक साजरी होणार नाही. तसे ते होणे गरजेचेच आहे कारण समाजाचे आरोग्य महत्वाचे आहे.
या साठी लोकांचे प्रबोधन करत मंडळाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी “मी ही रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी करीन. या ईदचा आनंद घेण्यासाठी मी भिन्नधर्मिय  गरजू बांधवांना शक्य ती मदत करुन माझ्या आनंदात सहभागी करीन. स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी  आवर्जून घेईन.” अश्या आवाहनाचे पोस्टर जागोजागी पोस्ट केले आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चालवलेला हा विवेकाचा जागर नक्कीच कौतुकास्पद आहे.

“करोना संकट काळातील ही रमजान ईद सर्वांर्थांनी संस्मरणीय ठरणार आहे.
या संकट काळात करोनाने सर्व धर्मांना,  श्रद्धा , विचार बाळगणाऱ्यां जगातील लोकांना एका मंचावर आणले आहे. ही रमजान ईद मुस्लीम सत्यशोधक मंडळ विवेक आणि मानवता जागरणासाठी आणि त्याच्या प्रती असणाऱ्या उत्तरदायित्वासाठी समर्पणाची भावना ठेवून साजरी करीत आहे. आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला आभिमान आहे.” असे प्रतिक्रिया देताना मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ.शमसुद्दीन तांबोळी म्हणाले.

मंडळाने चालवलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरातून स्वागत होत आहे. मंडळाची भूमिका व कार्य निश्चितच समाजाला दिशा देणारी व मार्गदर्शक अशी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *