Headlines

मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 20 : – मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली. विभागीय आयुक्त कार्यालयात मान्सून पूर्व तयारी बाबत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे,जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते, महावितरण विभागाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, प्रताप जाधव, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, यंत्र विभाग व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोनाच्या संकटाचा सामना करताना मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष होऊ नये, याची दक्षता घ्यावी. आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करुन अद्ययावत ठेवावा. हा आराखडा तयार करताना मागील वर्षातील त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. नाल्यांची सफाई, विजेचे खांब व पाईपलाईन ची दुरुस्ती ही कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करुन घ्यावीत. मागील वर्षी पुण्याबरोबरच सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे येथील नागरिकांची गैरसोय झाली होती. या वर्षी पावसामुळे अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्यात यावी. त्यासाठी नदीपात्रालगतच्या वसाहती व झोपडपट्टया इत्यादी धोक्याच्या ठिकाणांची यादी करुन गरज भासल्यास येथील नागरिकांच्या स्थलांतरणासाठी सोशल डिस्टंन्सिंगचा विचार करुन ठिकाणे निश्चित करावीत. नदीपात्रालगतच्या गावांतील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात यावे. मागच्या वर्षी विभागात सांगली व कोल्हापूर जिल्हयात गंभीर पुरपरिस्थिती उद्भवली होती, या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी यांनी धरणांचे व नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पुर्ण करुन घ्यावे. आपआपल्या जिल्हयातील नदयांच्या खोलीनुसार व नदीच्या प्रवाहाच्या वेगाचा अंदाज घेवून जास्त क्षमतेच्या बोटी खरेदी कराव्यात, असे सांगून त्यांनी विभागातील पाचही जिल्हयांच्या खरिप हंगाम पूर्व कामांचाही आढावा घेतला. शेतकऱ्यांना बि-बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले. यावेळी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, दौलत देसाई, शेखर सिंह, अभिजीत चौधरी, मिलींद शंभरकर यांनी आपापल्या जिल्हयात करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या मान्सुनपूर्व कामांची माहिती दिली. तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखडा, नदीकाठच्या गावांची यादी, खबरदारीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन, नागरिकांसाठी लाईफ जाकेटचे किट, आवश्यक साहित्यांची व बोटींची खरेदी आदी बाबींची माहिती दिली. तसेच खरीप हंगामपुर्व करण्यात आलेल्या तयारीची देखील माहिती दिली.

Leave a Reply