Headlines

बार्शीतील बाजारपेठा सुरु कराव्यात – व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 

बार्शी/प्रतिनिधी- बार्शीतील बाजार पेठ, इतर दुकाने, छोटे व्यावसाय सुरू करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत व बार्शीतील व्यापारी संघटनांचे शिष्टमंडळ  गुरुवार दि. 3 जून रोजी मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटले. या भेटीत इतर दुकाने, व्यवसाय सुरू करण्याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने इतर दुकाने सुरू करण्यासाठीबाबत निवेदन देण्यात आले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार मागील 2 महिन्यांपासून बार्शी शहर व तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत.



शासनाने जाहीर केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता बार्शी शहर व तालुक्याच्या बाजार पेठेतील सर्व प्रकारची छोटी-मोठी दुकाने, व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. या बंदचा परिणाम हा व्यापारी, छोटे व्यावसायिक, तेथील कामगार व यांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर,घटकांवर झाला असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. व्यापारासाठी घेतलेल्या बॅंकेच्या कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार, लाईट बिल, विविध शासकीय कर याबाबतीत ते मेटाकुटीला आले असून याचा परिणाम म्हणून त्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य ढासळत चालले आहे.


आत्तापर्यंतच्या कडक लॉकडाऊनचा परिणाम पाहता बार्शी शहर व तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येमध्ये घट होताना दिसत असून येथील पॉझिटिव्हीटी रेट हा १० टक्क्यांच्या खाली आहे. तसेच ऑक्सीजन बेडची उपलब्धताही ५० टक्क्यांवर आली आहे. या सर्व बाबींचा सहानुभूतीने विचार करता बार्शी  बाजार पेठेतील सर्व दुकाने, छोटे व्यावसायिक यांना निर्बंध घालून इतर दुकाने सुरू करण्याबाबत ग्रामीण भाग म्हणून बार्शीचा स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्याच्या आमदार राजेंद्र राऊत यांच्या विनंतीला मा.जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, शासनाकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्याची ग्वाही मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी शिष्टमंडळाला दिली.


यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष शेठ लोढा, संजय खांडवीकर, विनोद बुडूख, अविनाश तोष्णीवाल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *