Headlines

पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पिटल विरोधात आमरण उपोषणाचा इशारा…….

पंढरपूर/नामदेव लकडे-मोफत उपचाराच्या खोट्या जाहिराती देऊन रुग्णांची फसवणूक करणाऱ्या पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पिटलची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे निषेधार्थ व पीडित रुग्णास न्याय मिळवून देण्यासाठी सम्यक क्रांंती मंचाचे अध्यक्ष प्रशांत लोंढे हे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. या बाबत सविस्तर हकीकत अशी,  श्री महादेव नामदेव सावंत मु.पो. तुंगत, तालुका पंढरपूर हे सालगडी म्हणून मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांची सून प्रीती रणजित सावंत ही आठ महिन्यांची गरोदर असताना तिचा दिनांक 25 जून 2020 रोजी अचानक रक्तदाब वाढला, रक्तदाब वाढल्यामुळे तिला पंढरपूर येथील सर्वोपचार रुग्णालय (उपजिल्हा रुग्णालय), पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
तेथील डॉक्टरांनी  उपजिल्हा रुग्णालयात उपचार होऊ शकत नाही. तुम्ही रुग्णास सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे घेऊन जा, असा सल्ला दिला. परंतु सोलापुरातील कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या बातम्यांनी भयभीत असलेले उपरोक्त रुग्णांच्या नातेवाईकांना समाज माध्यमाद्वारे प्रसारित झालेल्या ‘प्रसूती व सिझर एकदम मोफत’ अशा आशयाची लाईफलाईन हॉस्पिटल ने दिलेली जाहिरात आठवली व त्यांनी आपल्या सुनेचा उपचार लाईफलाईन हॉस्पिटल येथे करण्यासाठी दिनांक 25 जून 2020 रोजी तिला तिथे घेऊन आले. परंतु लाईफलाईन हॉस्पिटल अडवणूक करीत अशा मोफत उपचाराची मर्यादा संपली आहे, तुम्हाला मोफत उपचार मिळणार नाही, तुम्हाला पैसे भरावे लागतील, आधी पंचवीस हजार रुपये ऍडव्हान्स भरा तरच उपचार करू असे सांगितल्याने रक्तदाब वाढलेल्या आपल्या सूनेची परिस्थिती पाहता लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी दहा हजार रुपयाची  जमवाजमव करून हॉस्पिटलला भरले व उपचार सुरू करण्यासंबंधी रुग्णालयास गयावया केली. तेव्हा उपचार सुरू होऊन रुग्णाची प्रसूती शस्त्रक्रियेव्दारे होऊन मुलगी झाली. 
आता रुग्णालय, त्यांनी केलेल्या उपचाराची फी वसूल करण्यासाठी आणखी ऍडव्हान्स भरा अन्यथा रुग्णाला आम्ही डिस्चार्ज देणार नाही, असे सांगत रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना तगादा लावल्याने आम्ही उप-विभागीय अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांच्याकडे दिनांक 29 जून 2020 रोजी व वैद्यकीय अधीक्षक, उप जिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्याकडे दिनांक 13 जुलै 2020 रोजी उपरोक्त घटनेची चौकशी करून दोषी असलेल्या लाईफलाईन हॉस्पिटलवर कठोर कारवाई करणे बाबत सविस्तर निवेदन दिले होते. परंतु संबंधितांनी कसलीही कारवाई न केल्याने निर्ढावलेल्या हॉस्पिटलने उपरोक्त रुग्णाकडून रुपये 47 हजार इतकी फी वसूल केल्याशिवाय त्या रुग्णाला सोडले नाही. ही अत्यंत गंभीर बाब असून प्रशासन याविषयी स्मरणपत्रे देऊनही दुर्लक्ष करीत असलेने अशा अधिकाऱ्यांकडून पीडित जनतेस न्याय मिळवून देण्यास भाग पाडण्यासाठी आम्हास आमरण उपोषण करणे क्रमप्राप्त झाले आहे. म्हणून आम्ही दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11:00 वाजले पासून पंढरपूर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करीत आहोत, असे सम्यक क्रांती मंचाचे अध्यक्ष प्रशांत लोंढे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *