Headlines

नियमित उपचार घेणा-या ज्येष्ठांची माहिती प्रशासन संकलित करणार

सोलापूर दि. 9: सोलापूर शहरातील नियमित उपचार घेणा-या ज्येष्ठ नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केले.
सोलापूर शहरात विविध गंभीर आजारांवर उपचार घेणा-या (कोमॉर्बिड) ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा होऊन मृत्यू होत असल्याचे दिसते.  हे प्रमाण थांबवण्यसाठी आणि कोमॉर्बिड ज्येष्ठ नागरिकांवर तत्काळ उपचार व्हावे यासाठी आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिका-यांसमवेत बैठक झाली. बैठकीस इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. हरिश रायचूर, डॉ. सुदीप सारडा, सोलापूर महानगरपालिकेचे डॉक्टर जयंती आडके, डॉ. शीतलकुमार जाधव, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की, शहरात ज्येष्ठ नागरिक खूप आहेत. ते विविध आजारांसाठी वैद्यकीय उपचार घेत आहेत. अशा नागरिकांवर नियमित लक्ष देणे आवश्यक आहे. अशा नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी. मधुमेह, रक्तदाब, ह्दय रोग, कर्करोग, एचआयव्ही, इत्यादी आजारावर उपचार घेणा-या नागरिकांची माहिती प्राधान्याने द्यावी. जेणे करुन अशा व्यक्तींशी संपर्क ठेवून त्यांना लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार करता येईल.
यावेळी व्यासपीठावर महापालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, सहायक पोलीस आयुक्त कमलाकर ताकवले,  प्रीती टिपरे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *