Headlines

जनतेसाठी, जनतेचे माध्यम!

                                     लाखो वर्षांपासून या जगात मानव नावाच्या प्राण्याचा वावर आहे. येत्या काही शतकात तो असेल का याची शाश्वती देता येणार नाही. पण त्याचा जो आतापर्यंतचा प्रवास झाला आहे तो नक्कीच धाडसी, उल्लेखनीय आणि दखल घेण्याजोगा आहे. हजारो वर्षांपासून तो समूहात राहू लागला. त्याने अग्नी, हत्यार, चाक या त्रिकुटांचा शोध लावला आणि तो पृथ्वीचा राजा झाला. तसा हा सेपियन्स हिंस्रच. नियंडरथल, इरेक्टस आदी भाऊबंदांना पिछाडी देऊन त्याने या वसुंधरेवर घट्ट पकड मिळवली. आणि आता हळूहळू करून तो या निसर्गालाही आपल्या कवेत घेत आहे.



        या मानवांमध्ये जसे हिंस्र राक्षसी मानव जन्माला आले, तसे काही नियम, नीती, विवेक सांगणारे मानव आणि समूह निर्माण झाले. तेव्हाच या मानवाला नैतिकदृष्ट्या मर्यादित करण्यात थोडेफार यश आले. त्या समूहांपैकी एक समूह म्हणजे ‘पत्रकारिता’.
        समाजात चांगलं का पेरायचं? नीतिमान आणि विवेकी समाज का घडवायचा याचे कारण बघायचे असल्यास संत तुकाराम महाराजांचा एक अभंग लक्षात घेतला तरी समजेल. “बुडता हे जन, न देखवे डोळा। येतो कळवळा, म्हणोनिया।।” असे म्हणत चांगले कार्य का करायचे याचा परिपाठ तुकोबांनी घालून दिला. हेच काम पत्रकारांचेही आहे. समाजात नीतिमत्तेची पेरणी व्हावी, खल प्रवृत्ती नष्ट व्हावी व सगळ्यांचा शाश्वत विकास व्हावा हेच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता पुढे जात असते.
        परंतु कुंपनच शेत खातंय या उक्तीप्रमाणे समाजाचा खूप मोठा व महत्वाचा आधार असलेला माध्यम हा समाजद्रोही बनतो तेव्हा त्याचे शुद्धीकरण गरजेचे असते. कारण समाज आहेत म्हणून या संस्था आहेत, संस्था आहेत म्हणून समाज नाही. म्हणून समाजात एक विश्वासार्ह आणि समाजाला आपला वाटणारा माध्यम म्हणून आम्ही आपल्यासमोर येत आहोत. आम्ही नवीन आहोत, साधनं, नेटवर्क याबाबतीत सध्या नवखे जरी असलो तरी सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रचंड ताकदीचा असेल.
        आम्ही पत्रकारितेची पावन परंपरा जोपासत आधुनिक पद्धतीने लोकांसमोर येण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी माध्यमांची नवनवीन तंत्रज्ञाने व व्यसपीठे यांचा पुरेपूर वापर आम्ही करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या ब्लॉगचे लोकार्पण करीत आहोत. याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
        या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी रोज एक, त्या त्या विषयाचे तज्ञ असे तरुण लेखकांचे लेख प्रकाशित करणार आहोत. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, समाजभान- सामाजिक, घडामोडी, कृषी, विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण, क्रीडा, आरोग्य, अर्थकारण, ग्रामीण भारत, युवा स्पंदन, मनोरंजन विश्व, साहित्य विश्व, करियर मार्गदर्शन इतक्या भरगच्च विषयावर रोज एक याप्रमाणे अत्यंत सखोल व मुद्देसूद मांडणी आपल्यासाठी दररोज येणार आहे. त्याच प्रमाणे विविध छायाचित्रेही आपल्या भेटीला येणार आहे.
      आपण प्रचंड प्रेम दिले आहे. आताही ते असेल अशी अपेक्षा नाही तर खात्री आहे. खरंतर हे तुमचेच माध्यम आहे. आमचे ब्रीद वाक्यच ‘जनतेचे न्यूज चॅनल’ आहे. त्यामुळे याच्या यशाचे खरे मानकरी तुम्हीच असणार आहात. पुन्हा भेटू.


                                                                                                                   – जावेद शाह
                                                                                                            सहसंपादक, ए.बी.एस. न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *