चला गांधी समजुन घेवु..!


गांधीला चुकीच ठरविण्यासाठी अनेकांच्या खांद्यावर कट्टरतावाद्यांनी बंदुका ठेवल्या. ज्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांचं कधीही पटले नाही अशांनी गांधीला विरोध करण्यासाठी त्यांचा वापर केला. सुभाषबाबू तर गांधीला राष्ट्रपिता म्हंटले त्यांना ही गांधींच्या विरोधात उभे केले. भगतसिंग, सुखदेव यांच्या फाशीवरून त्यांना ही गांधींच्या विरोधात उभे केले. पण भगतसिंग यांना फाशी थांबावी हे मान्य नव्हते. कारण फाशी थांबली तर देशभरातील युवकांना मिळालेली प्रेरणा नाहीशी होणार होती ते भगतसिंगाना मान्य नव्हते. गांधीने आयर्विन करारा अंतर्गत हजारो कैद्यांची सुटका केलेली हे मात्र सोईस्कररित्या लपवले जाते.  

चला गांधी समजुन घेवु..!

गांधी म्हंटले की कधी अतिवप्रेम तर कधी टिंगल – टवाळी, प्रचंड व्देष बघायला मिळतो. 

हा गांधी ना कोणत्या प्रांताचा झाला, ना कोणत्या जाती-धर्माचा झाला. हा गांधी फक्त राहिला तो भारतीयांचा आणि हा भारतही राहिला तो फक्त गांधीचाच. 

भारताची ओळख गांधींचा देश म्हणून सबंध जगभर झालेली दिसते. पण अशा वेळी बऱ्याच जणांकडून गांधींची टिंगल-टवाळी केली जाते अन्  त्यांच्याविषयी व्देषही बघायला मिळतो. 

हे सर्व काही सर्वसामान्यांना संभ्रमात टाकणारच आहे. बारकाईने निरीक्षण केल्यावर लक्षात आले, गांधींचा व्देष करणाऱ्यांनी ना कधी गांधी वाचला,ना कधी नथुराम वाचला. अशा लोकांकडे वैचारिक दिवाळखोरीचेच हे परिणाम आहेत हे लगेचच लक्षात येतं. अशांना विचार करायलाच शिकवले गेले नाही. प्रेमाने जग जिंकायचं सांगणाऱ्या गांधींविषयी तीव्र व्देष शिकवला..! ही परिस्थिती बघुन गांधींवर थोडस लिहावंस वाटलं. 

गांधी समजुन घेणं खरचं खुप अवघड आहे. गांधींबद्दल मी लिहणे म्हणजे नळाच्या कृपेने पाऊस पडण्यासारखे आहे. तरीही गांधी लिहायचं धाडस करतोय.

 

भारत स्वातंत्र्यासाठी लढा देत होता. पण स्वतंत्र मिळाले तर ते कसे असेल यांचा कोणी विचार केला नव्हता. बरीच लोकांना फक्त राजकीय स्वातंत्र हवं होतं. राजकीय स्वातंत्र म्हणजे विशिष्ट वर्गाची मक्तेदारी. अशा वेळी आफ्रिकेतुन बॅरिस्टर गांधी येतो. लोकांना सांगतो आपल्याला स्वातंत्र्य कसे हवं आहे. स्वातंत्र का, कशासाठी, कोणासाठी याची व्याख्या करतो. तो श्रमाला प्रतिष्ठा देऊ इच्छितो, म्हणजेचं श्रम करणाऱ्याला सत्ता हे स्वप्न तो पाहतो.. राजकीय स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य नव्हे तर श्रमिकांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य म्हणजे खरे स्वातंत्र्य हीच धारणा घेऊन  गांधी पाऊल टाकायला सुरवात करतो. तो राजकिय व सामाजिक दोन्ही स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. म्हणूनच विशिष्ट लोकांच्या डोळ्यात खुपायला चालू होतो. 

गांधी स्वातंत्र्य लढयाबरोबर अनेक सामाजिक प्रश्न (शेतकरी, कष्टकरी, शोषितांचे प्रश्न..)हाती घेऊन स्वातंत्र्य लढ्याला कलाटणी देतो. स्वातंत्र्याचा उपभोग शेवटच्या माणसाला ही घेता यावा यासाठी तो प्रयत्न करतो. अशा वेळी त्याला प्रचंड विरोध होतो. काँग्रस च्या व्यासपीठावर सामाजिक प्रश्नांचा विठाळ नको म्हणत असताना, गांधी त्याठिकाणी सामाजिक प्रश्नच मांडतो.  टिळकांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी गांधी सरसावतो. तेव्हा त्याच गांधीची ब्राह्मण नसल्याने अडवणूक होते. तेव्हा अडवणूक करणाऱ्या इसमाला हा गांधी म्हणतो, ‘लोकसेवकाला जात असते, असे मी मानत नाही.’ आणि टिळकांच्या पार्थिवाला खांदा देत विषमतेची दरी नाहीशी करण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व तो स्वतः आधी अंमलात आणतो मग जगाला सांगतो.

गांधीला जातीयवादी म्हंटल गेलं. हाच गांधी जातीयवाद नाहीसा करण्यासाठी जीवाचं रान करतो. या गांधीने भारतात आल्या आल्या कोचरब येथील आपल्या आश्रमात अस्पृश्य जोडप्याला प्रवेश दिला. यावेळी आश्रमात वादळ उठलेच; परिसरात खळबळ ही माजली. त्या जोडप्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पण डगमगतो तो गांधी कसला. गांधी आपल्या निर्णयावर ठाम राहिला. यावेळी आपला आश्रम बंद पडेल, आश्रमाला देणगी मिळणार नाही या कशाचाही विचार त्याने केला नाही. आजही जात मनातून जातच नाही त्यावेळी काय परिस्थिती असेल याचा फक्त आपण विचार करू शकतो. गांधीने भंगी मुस्लिम व्यक्तीला खाणकाम म्हणून कामाला ठेवले. अशातुनच विकृतीची वाटचाल गांधी हत्येकडे  चालू झाली.

गांधींच्या अहिंसेची बरीच टिंगलटवाळी, घृणा केली जाते. पण कोण गांधींची अहिंसा काय आहे हे समजुन घेताना दिसत नाही. गांधींच्या अहिंसेला आपल्याच देशात भेकड ठरवले. पण गांधींची अहिंसा आज जगाने स्वीकारली. अहिंसा अन्यायाविरोधात तीव्र प्रतिकार, उठाव करायला शिकवते. गांधींची अहिंसा कधीही सैन्य भरतीला विरोध करीत नाही. उलट गांधी म्हणतो पाकिस्तान जर असाच वागत असेल तर युद्धाशिवाय पर्याय नाही. द्वेषातून व्देष, युद्धातून युद्ध तयार होते हे गांधींची अहिंसा सांगते.

गांधी म्हणतो ‘माझ्या एका गालावर मारले की मी दुसरा गाल पुढे करेन..’ हे गांधीच्या संदर्भातील विधान ऐकले की गांधींची अहिंसा भेकड वाटायला लागते. विकृत लोकांनी फक्त हे संदर्भहीन विधान पुढे आणले. त्यामुळे साहजिकच अहिंसा भेकड वाटायला लागते. परंतू वस्तुस्थिती ही आहे की गांधीने हे वाक्य हरिजन यात्रेदरम्यान वापरले.. ‘हरिजनांवर सवर्णाने आत्तापर्यंत इतका अन्याय-अत्याचार केला आहे की, हरीजनांनी माझ्या एका गालावर थपड जरी मारली तरी मी दुसरा गाल पुढे करेन तरीदेखील त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन होणार नाही.’ या गांधींच्या विधानाचा सोईस्कर पणे विपर्यास केला गेला.

स्वतःला सनातनी हिंदू म्हणणाऱ्यांनी गांधीला मुस्लिमधार्जिना ठरवला, तर काहींनी हिंदूंच्यात जन्माला आलेला औरंजेब ठरवले. पण कट्टर रामभक्त गांधी मुस्लिमधार्जिना कसा असू शकतो. आयुष्यभर रामनामाचा जप केला. गांधी हिंदू होते पण हिंदुत्ववादी नव्हते. गांधी चा राम अस्पृश्यता मनात नव्हता. हेच धर्मांधांना रुचल नाही. म्हणून गांधीला मुस्लिमधार्जिना ठरवत हिंदूंपासून दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दुसरीकडे धर्मांध मुस्लिमांनी गांधीना हिंदुधार्जिना ठरवले. कारण त्यांना ही गांधी रुचत नव्हता. मुस्लिम लीग साठी तो मुस्लिमांचे ‘हिंदुकरन’ करणारा असतो. ऐकूनच काय हिंदू,मुस्लिम धर्मांधांना गांधी चालत नाही. गांधी प्रेम शिकवतो.  गांधी म्हणतो, ‘जर डोळ्याचा बदला डोळ्याने घेतला तर सार जग आंधळे होईल.’  म्हणजेच गांधी ना धड हिंदुधार्जिना होता, ना मुस्लिमधार्जिना, गांधी मनुष्यधार्जिना होता.

गांधी देवाच्या बाबतीत अस्तिकांच्या,नास्तिकांच्या दोघांच्याही अडचणींचा ठरतो. तो देव मानतो. पण कर्मकांडांना विरोध करतो. गांधीने संतपरंपरे प्रमाणे देवाचा विरोध केला नाही. तुकोबानी ढोंगी भोंदूबुवा, कर्मकांड याच्यावर प्रहार केला. तर संत गाडगेबाबांनी मिर्तीपूजेच्या बाबती कठोर शब्दात टीका केली. पण पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून धर्मशाळा बांधुन निवासाची सोय केली. ऐकून काय या सर्वांनी देव नाकारला नाही. पण देव तुम्ही म्हणता तसा नाही हे मात्र आवर्जून सांगितले. माणसात देव बघायला शिकवले. हेच जर देव नाकारणाऱ्याने सांगितले तर मात्र लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असत्या. म्हणूनचं तुकोबा कर्मकांड, ढोंगीबाजाना विरोध करतात पण विठ्ठल कधी सोडत नाहीत. गाडगेबाबा मूर्तीपूजेला विरोध करतात पण आयुष्यभर ‘गोपाला रे गोपाला देवकी नंद गोपाळ’ म्हणत गोपालाला सोडत नाहीत. गांधी अस्पृश्यतेला,कर्मकांडाला विरोध करतात पण ‘रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम’ म्हणत कधी राम सोडत नाही. आयुष्यभर रामनामाचा जप करतात.’

संतांनी देव, धर्माचे शेपूट धरत माणसाला माणसासम जगायला शिकवले. जगण्याचा मतितार्थ सांगितला.

गांधीला चुकीच ठरविण्यासाठी अनेकांच्या खांद्यावर कट्टरतावाद्यांनी बंदुका ठेवल्या. ज्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांचं कधीही पटले नाही अशांनी गांधीला विरोध करण्यासाठी त्यांचा वापर केला. सुभाषबाबू तर गांधीला राष्ट्रपिता म्हंटले त्यांना ही गांधींच्या विरोधात उभे केले. भगतसिंग, सुखदेव यांच्या फाशीवरून त्यांना ही गांधींच्या विरोधात उभे केले. पण भगतसिंग यांना फाशी थांबावी हे मान्य नव्हते. कारण फाशी थांबली तर देशभरातील युवकांना मिळालेली प्रेरणा नाहीशी होणार होती ते भगतसिंगाना मान्य नव्हते. गांधीने आयर्विन करारा अंतर्गत हजारो कैद्यांची सुटका केलेली हे मात्र सोईस्कररित्या लपवले जाते. 

गांधीहत्ये ची दिली जाणारी कारणेही तशीच हास्यास्पद वाटतात. कारण  पाकिस्तान, फाळणी हे शब्द अस्तित्वात नसताना गांधींवर जीवघेणे हल्ले झालेले. पाकिस्तान, 55 कोटी याबाबत गांधीहत्या करायची होती तर मग मुस्लिम राष्ट्राची मागणी करणाऱ्या, हिंदूंवर अत्याचार करायचा आदेश देणाऱ्या धर्मांध जिन्नाची हत्या यांना का करावी वाटली नाही…? कारण जिन्ना त्यांना आपलासा वाटत होता. 

ज्या माणसाने आयुष्यभर देशातील शेवटच्या माणसाला ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्रयत्न केले त्या 125 वर्षे जगणार असंं म्हणणाऱ्या गांधींचे जगण्याचेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विकृतीनीं हिरावले. तरीही गांधी नथुरामच्या गोळीने मरत नाही. गांधी अमर आहे आणि अमरच राहणार. 

गांधी मृत्यूनंतर विनोबा प्रतिक्रिया देतात, “माझ्या मनाला असेच वाटते की गांधींचा मृत्यू झालाच नाही आणि आजपर्यंत माझ्या मनात हाच विचार आहे की ते जिवंत आहेत. सज्जनांचा कधी मृत्यू होत नाही, ते सदाचे जिवंत असतात आणि दुर्जन कधी जिवंत असतच नाहीत, ते फक्त कल्पनेच्या जगात जगत असतात.”

गांधीने सत्याग्रह ही जगाला दिलेली देणगी आहे. याच सत्याग्रहाची टिंगल भारतात केली जाते. गांधी चिमूटभर मीठ उचलायला 200 मैलांच्या प्रवासाला निघाला. यावेळी पटेल, नेहरू सारख्या नेत्यांनी ही त्यांना विरोध केला. याने काही होणार नाही असे ते म्हणत. गांधी थोडक्या लोकांना घेवून दांडी च्या दिशेने निघाला. लोकांना सोबत घेत गावो-गावी फिरत, सामाजिक प्रश्न सोडवत निघाला. बघता बघता सोबत हजारो लोक जोडले गेले. विरोध करणारे पटेल, नेहरू आश्चर्य करत ते ही सोबत आले. गांधीने मीठ उचलले. देशभर कायदेभंग सुरू झाला. तुरुंगच्या तुरुंग भरली गेली. इंग्रज सरकार हादरले. इतक्या कायदेभंग करणाऱ्या लोकांना ठेवायचे कुठे..? हेच देशप्रेम गांधीने चिमूटभर मीठ उचलून दिलेले. तेच मीठ गांधीने सोने 40 रुपये तोळा असताना अर्धा तोळा मीठ 525 रुपयांना विकले. कचऱ्याला ही सोन्याचा भाव मिळवून द्यायची ताकत गांधीत होती. 

गांधींच्या वागण्यातून, जीवनशैलीतून गांधींच्या शब्दाला धार आलेली. लोक गांधींसाठी काहीही करू इच्छित..

गांधी स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्यानंतर आज अखेरीस आणि इथुन पुढे ही जगभरातील लोकांना आदर्श ठरतोय. डॉ.राजेंद्रप्रसाद, नेहरू, पटेल हे महान गांधीवादी नेते होवुन गेले. कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,अतिरेकयांशी लढनारी नोबेल पुरस्कार विजेती मलाला, बाबा आमटे, सुधा मूर्ती, नारायण मूर्ती, बराक ओबामा, नेल्सन मंडेला, लुई पॉइचर, अजीम प्रेमजी यांच्यासारख्या कित्येक प्रतिभावंत लोकांचा आदर्श गांधी ठरला. अल्बर्ट आइन्स्टाइन ला तर 19 व्या शतकात गांधी सारखे सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व झाले याच आश्चर्य वाटत. आईन्स्टाईन म्हणतो, गांधीसारखा हाडामासाचा माणुस पृथ्वीतळावर होऊन गेला, यावर पुढील पिढी कदाचित विश्वास ठेवणार नाही.  

माझ्यासारख्या सामान्य विध्यार्थ्यांला प्रश्न पडतो ही प्रतिभावंत लोक नक्कीच कोणा येड्या गबाळ्याला आपला आदर्श मानणार नाही. आदर्श व्यक्तिमत्त्व तितकेच तोला-मोलाचे असणार. ही गांधीला आदर्श मानणारी प्रतिभावंत, महान लोक वेडी आणि आपण शाहणे गांधीला गांधी न वाचता देशद्रोही ठरवणारे. अशाच विचारातून माझा प्रवास गांधी समजुन घेण्याकडे झाला. 10 वी,11 वी पर्यंत  गांधींबद्दल अत्यंतिक व्देष होता. नंतर चांगली लोक भेटली त्यांनी विचार करायला शिकवले. नंतर शरद पोंक्षे, आफळे बुवा यांकज्यकडून नथुराम ऐकला; चंद्रकांत वानखेडें सारख्या गांधी जगलेल्या माणसाकडून व विश्वंभर चौधरी यांच्याकडून गांधी ऐकला. तेव्हा कुठं खरा गांधी आपल्याला कळू दिला नाही हे लक्षात आले. माथेफिरूला हिरो ठरवुन वैयक्तिक स्वार्थ साधला गेला. गांधी बद्दल बरेच गैरसमज होते तर नथुराम बद्दल बरेच समज ते सर्व दूर झाले. मला गांधीचा आदर्श घेवुन समाज्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे कित्येक प्रतिभावंत लोक दिसतात पण नथुरामचा आदर्श घेवुन समाज्यासाठी काम करणारा अथवा केलेला एकही दिसत नाही.

हिटलर,मुसोलिनी,गांधी हे जगभरातील प्रभावी नेतुत्व जवळपास एकाच कालखंडात झाले. हिटलर, मुसोलिनी चा विचार मरून गेला सत्य, अहिंसा, प्रेम, प्रामाणिकता, त्याग शिकवणाऱ्या गांधीचा विचार आज ही मरत नाही. तो जगाने स्वीकारला. म्हणूनच जगभर गांधींचा गौरव केला जातो. गांधी विरोधकांना ही गांधीशिवाय पर्याय नाही. गांधींचे नाव घ्यावे लागते ती त्यांची मजबुरी आहे. अब्राहम लिंकन पासुनच किंबहुना त्याच्याही कैक शतके अधिपासुनचा इतिहास आहे, विचार मारता येत नसेल तर माणूस मारला जातो.

  आज गांधीविचारांची गरज आहे. गांधीने दिलेल्या देशप्रेमाची गरज आहे. आज ची आमच्यासारखी तरुण पिढी  खुन्नस, मारामारी, अहंकार, व्यसन यासारख्या गोष्टींच्या साखळदंडात गुरफडून गेली आहे. अशा तरुण पिढीने गांधी समजुन घेण्याची गरज आहे. गांधी आत्मसाद करणे खुपच अवघड आहे तरीही गांधी आत्मसाद करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गांधी समजुन घेतला पाहिजे. आपण ऐकत्र येत गांधी समजुन घेवुन, गांधी आत्मसाद करूयात.

माझा हा ‘चला गांधी समजुन घेवु..!’ हा छोटासा लेख वाचलात त्याबद्दल मनःपूर्वक आभार..आपणांस गांधींबद्दल काय वाटते नक्की कळवा..

धन्यवाद..!

✍🏻 आपलाच- प्रतिक दिपक पाटोळे.

विद्यार्थी-तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय वारणानगर.

संपर्क-7559198475.

संदर्भ- गांधी का मरत नाही- चंद्रकांत वानखडे.

One thought on “चला गांधी समजुन घेवु..!

  1. अप्रतिम लेख, अनेक बुद्धिवंत लोकाचे गैरसमज दूर करणारा लेख…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *