Headlines

गजा मारणे याला धाडस दाखवून अटक करणाऱ्या पोलीस कर्मचार्‍यांचा गृहराज्यमंत्र्यांनी केला गौरव


सातारा : कमी मनुष्यबळ असतानाही मेढा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी गजा मारणे याला अटक केली याबद्दल शासनाकडून योग्य सन्मान व्हावा यासाठी पाठ पुरावा करणार असल्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी सांगितले.

गजा मारणे प्रकरणी कारवाईत समावेश असलेल्या मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे, इम्राण मेटकरी व अमोल पवार यांचा सत्कार गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या सत्काराप्रसंगी पोलीस अधीक्षक अजकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.


गजा मारणे याच्या शोधात पोलीस होते. कमी मनुष्यबळ असतानाही मेढा पोलीस ठाण्याने त्याला अटक केली. त्यांचे कौतुक करुन शासनाकडून योग्य तो सन्मान व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही श्री.देसाई यांनी सत्काराप्रसंगी सांगितले.


यावेळी पोलीस हवालदार मोना निकम यांनी नऊवारी साडी घालून हिरकणी कडा सर केल्याबद्दल गृह राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.


नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई


जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हावासियांनी शासनाने तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हात धुणे तसेच अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.


मॉल, मार्केटमध्ये गर्दी दिसत आहे, अशा ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगून श्री.देसाई म्हणाले, कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत त्याचबरोबर टेस्टींगचे प्रमाणही वाढविले आहे. पोलीस विभाग व नगर परिषदेला विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर रात्री पेट्रोलिंगचे  प्रमाण वाढविण्याबाबतही पोलीस विभागाला सांगण्यात आले आहे.


जिल्हावासियांनी कठोर उपाययोजना करण्याची वेळ आणू नये शासनाने व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन मास्कचा वापर, सुरक्षित अतर व वेळोवेळी हात धुणे याचा वापर करावा, असेही आवाहन गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *