Headlines

अॅड. प्रकाश आंबेडकर प्रथम चंद्रभागा व पुंडलिकाचे दर्शन घेतील , नंतर वारकऱ्यांसमवेत विठ्ठल मंदिरात प्रवेश करणारच : आनंद चंदनशिवे




विठ्ठल मंदिर उघडण्यावर वंचित,विश्र्व वारकरी सेना ठाम ; वंचितला प्रतिसाद पाहून भाजपाचाही घंटानाद आंदोलन फार्स
पंढरपूर/नामदेव लकडे- लाॅकडाउन मुळे मागिल पाच महिन्यांपासून बंद असणारे विठ्ठलाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे यासाठी मंदिर प्रवेश करणारच यावर वंचित बहुजन आघाडी व विश्र्व वारकरी सेना ठाम असून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हाणून पाडीत आंदोलन यशस्वी करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.ते पंढरपूर येथे पञकार परिषदेत बोलत होते.
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपाने राज्यभर घंटानाद आंदोलन केले. यावर वंचित बहुजन आघाडीने टीका केलीय. भाजपचे ‘दार उघड’ आंदोलन मंदिरासाठी नाही सत्तेसाठी आहे. सत्तेचे दार उघडण्यासाठी हे सारे खटाटोप आहेत. प्रकाश आंबेडकर यांना राज्यभरातून मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे भाजपने आंदोलनाचा फार्स केला आहे, असेही चंदनशिवे म्हणाले.
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर खुले करण्यासंदर्भात वंचित बहूजन आघाडी व विश्र्व वारकरी सेनाच्या वतीने सोमवारी होणार्या आंदोलनाची माहितीही दिली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर प्रथम चंद्रभागा व पुंडलिकाचे दर्शन घेतील व नंतर वारकऱ्यांसमवेत विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील, असे वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी सांगितले. वंचितला राज्यातील वारकरी संप्रदायाचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून आज भाजप कडून घंटानाद आंदोलन केले जात असून त्यांचे आंदोलन केवळ राजकारणासाठी असल्याची खरमरीत टीका चंदनशिवे यांनी केली.
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारकऱ्यांसमवेत मंदिरात प्रवेश करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. ते येत्या सोमवारी पंढरपुरात लाखो वारक-यांच्यासमवेत मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी मंदिरे व अन्य धार्मिक स्थळांची दारे मात्र अद्याप बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिरे उघडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे.
मुख्यमंत्र्यांनी गाजर दाखवल्याचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर चर्चेचे केवळ गाजर दाखवले मात्र कोणतीही चर्चा घडवून आणली नाही, असाही आनंद चंदनशिवे सांगितले. वारकरी परंपरांचे पालन करीत मंदिर प्रवेश होणार असून राज्यातल्या २०० पेक्षा जास्त संघटनांनी वंचितच्या होणा-या आंदोलनास पाठिंबा दिल्याचा दावाही चंदनशिवे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *