Headlines

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ८४ आयटीआयमध्ये ८ हजार ३४८ जागांसाठी 1 ऑगस्टपासून प्रवेशप्रक्रिया

बेरोजगार तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजगारविषयक मार्गदर्शनासाठी आता ऑनलाईन समुपदेशन

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई –अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्याच्या अनुषंगाने यंदा राज्यातील 44 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीतील वर्ग चालविले जाणार आहेत. याबरोबरच 40 खाजगी आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या चालविण्यात येणार आहेत. या माध्यमातून 84 आयटीआयमध्ये एकुण 8 हजार 348 जागांवर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी उपलब्ध होत आहे. 1 ऑगस्टपासून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर सुरु होणाऱ्या नियमित आयटीआयच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबरोबरच या वर्गांचीही प्रवेशप्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. या समुदायातील इच्छूक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थी नियमित आयटीआयसाठीही अर्ज करु शकतात. तसेच अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय आयटीआयमध्ये असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीतील वर्गामध्ये सर्वसाधारण आणि इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही 30 टक्के जागांवर प्रवेश दिला जाणार आहे, जेणेकरुन सर्व समाजातील विद्यार्थी एकत्र शिक्षण घेऊ शकतील, अशी माहितीही मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता 44 शासकीय व 40 खाजगी आयटीआय मधून प्रवेशासाठी अनुक्रमे 197 व 189 तुकड्या या वर्षी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्याद्वारे एकूण 8 हजार 348 विद्यार्थी या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. शासकीय आयटीआयमध्ये 4 हजार 304 तर खाजगी आयटीआयमध्ये 4 हजार 044 जागा भरल्या जाणार आहेत, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.       

प्रवेश प्रक्रिया

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून 1 ऑगस्ट 2020 पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. अल्पसंख्याकांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या वर्गांचीही प्रवेश प्रक्रिया याच पद्धतीतून होईल. तथापी, सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया सुरु होत असून आयटीआय वर्ग कधी सुरु होणार याबाबत लॉकडाऊनसंदर्भातील शासनाच्या नियमांना अनुसरुन नंतर माहिती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.  

उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी

प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुतीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. चालू वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीचा  प्रभावी वापर केला जाणार असून प्रवेश अर्ज व अर्ज नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, प्रमाणपत्रे तपासणी, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे ऑनलाईन करता येणार आहेत. प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

माहिती पुस्तिकापाहा
व्यवसाय निहाय मागील 3 वर्षांचा कटऑफ: पाहा

जाहिरात: पाहा

5 thoughts on “अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ८४ आयटीआयमध्ये ८ हजार ३४८ जागांसाठी 1 ऑगस्टपासून प्रवेशप्रक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *