Headlines

अण्णाभाऊंच्या साम्यवादी विचारांची आजच्या काळाला गरज- प्रा. संजय साठे

बार्शी – बार्शी नगरपालिका बार्शी यांच्यावतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव 2020 बार्शी  नगरपालिका बार्शी या फेसबुक पेज वर ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आले.  हे व्याख्यान दिनांक 13 ऑक्टोबर 2020 रोजी झाले. अण्णाभाऊंची शाहिरी या विषयावर  प्राध्यापक संजय साठे व्याख्यान झाले. व्याख्यानाचे तिसरे पुष्प गुंफले गेले. येथे प्राध्यापक संजय साठे हे विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी येथे प्राध्यापक म्हणून म्हणून काम  करतात ते साहित्यिक संशोधक आहेत.

व्याख्यानात प्राध्यापक संजय साठे म्हणाले,, अण्णाभाऊंच्या साम्यवादी विचारांच्या आजच्या काळाला गरज आहे कारण आजची  परिस्थिती ही शेतकरी श्रमजीवी विरोधी आहे. अण्णा भाऊंचा शाहिरी हा प्राण होता. वर्ण वर्ग वादाची जाणीव असलेले अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर होते.  अमर शेख, दत्ता गव्हाणकर यांच्यासोबत लाल बावटा कला पथकाची निर्मिती करत त्यांनी समाजपरिवर्तनाचा झेंडा हातात घेतलेला होता. मुंबईच्या सभा  संमेलनांमध्ये ते श्रमिकांपुढे शाहिरी गात.  शाहिरीच्या कवनामध्ये काल्पनिक ईश्वराला न करता त्यांनी मायभुला, छत्रपती शिवरायांना नमन केले हा शाहीरीतला क्रांतिकारी बदल त्यांनी केला.  स्पेनचा फॅसीझम विरोधी पोवाडा तसेच स्टॅलिनग्राडचा चा पोवाडा हा जागतिक कम्युनिजमला अधोरेखित करत हिटलरचा पराभव मांडत कम्युनिस्ट चळवळीचा अभिमान व्यक्त करतात व त्यांची झुंजार वृत्ती त्यासोबतच त्यांचे देशावरती असणारे प्रेम ते या पोवाड्यामध्ये दाखवून देतात.  

पोवाड्यामध्ये लढलेल्या स्त्रियांचे ते कौतुक करतात त्यात ते म्हणतात “जगी शूर स्त्रिया फार झाल्या, झाल्या असतील कित्येक परी बिनजोड रुसी ललना.” बर्लिनच्या पोवाडा मध्ये जागतिक लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यांची निर्मिती करण्यासाठी झालेला लढा मांडतात.  बंगालचा पोवाडा हा दुष्काळावर आधारित असा आहे त्यात ते म्हणतात “शील कुल मुल विकून जगविली पोटाची आग” ही विदारक परिस्थितीचे वर्णन करत बंगालच्या लोकांना मदतीचा हात देण्याची हाक देतात. असा मानवतावादी दृष्टिकोन असणारे अण्णाभाऊ पंजाब दिल्ली दंग्याच्या बाबत धर्मांध  समाजकंटकांना उद्देशून म्हणतात “पंजाब झाला बेभान शिक हिंदू-मुसलमान वयाला पार विसरून आपापसात पाडती खून इंग्रजी गेले आग लावून”  याच पोवाड्यात ते भगतसिंगांची आठवण काढून भगतसिंगाचे वारसदार दंगा कसं काय करू शकतात असा सवाल करतात.  तेलंगणाचा लढा या पोवाड्यात अण्णाभाऊ येथील शेतकऱ्यांनी प्रस्थापित व्यवस्थेविरोधात केलेल्या बंडाचा अभिमान बाळगतात व इतर कष्टकऱ्यांना तसा बंड करण्यास प्रेरित करतात.  

गिरणी कामगार या पोवाड्या मध्ये कामगारांची विदारक अवस्था ते मांडतात ते म्हणतात ” बा कामगारा तुजपाशी अपारशक्ति नांदे मुंबई तळहातावर ती” यामध्ये श्रमिकाला त्याच्या शक्तीच्या आठवण करून देतात.  काळ्याबाजाराचा पोवाडा या पोवाड्यात नफेखोर भांडवलदार यांच्यावर कडवट टीका करून अण्णाभाऊ श्रमिकांची पिळवणूक कशी होते याचे वर्णन करतात.  त्यात ते म्हणतात ” राबराबून  आम्ही पिकवितो शेत गाळीतो घाम, खाया नाही अन्न, झाले हैराण, कपड्याविना, तेलाशिवाय जाळतो दिवा.  अमळनेर ते अमर हुतात्मे हा पोवाडा हुतात्म्यांना अर्पण आहे.  लावण्यामध्ये अण्णाभाऊ “बदल ही दुनिया सारी” असे म्हणून संघटित होण्याची हात देतात.  . “शिवारी चला” ही रूपकात्मक रचना करत “सावकारशाहीचा चिवट केना, भांडवलशाहीचा पाडायचा रेंदा साम्राज्यशाही ची माकडे हाकलायची आहेत” यासाठी “बांधावरती लाल बावटा रोवण्याची” हाक देतात. अण्णाभाऊंची शाहिरी पोवाडे लावण्या हे सर्व काही साहित्य श्रमिकांना मार्क्सवादी पद्धतीने संघटित होऊन संघर्षाची हाक देतात.या व्याख्यानासाठी बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष अॅड. असिफ भाई तांबोळी सोबतच तानाजी ठोंबरे, श्रीधर कांबळे यांनी मार्गदर्शन केले.   वकत्यांची ओळख पवन अहिरे यांनी केली तर आभार प्रवीण मस्तुद यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *