Headlines

…अखेर मादी बिबट आलीच नाही; बकरीचे दूध पाजून पिलांचे संगोपन!

बिबट्याची चारही पिले गोरेवाडा प्रकल्पाकडे हस्तांतरित

अकोला- येथील पातूर वनपरिक्षेत्रातील मौजे पास्टूल येथे १५ दिवसांपूर्वी सापडलेले बिबट्याचे चार बछडे आज गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्यात आले, अशी माहिती उपवनसंरक्षक वि.ग. माने यांनी दिली. इतके दिवस वाट पाहूनही त्यांची आई अर्थात मादी बिबट आलीच नाही. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तब्बल १५ दिवस या चारही पिलांना ममतेने सांभाळलं. बकरीचे दूध पाजून त्यांचे संगोपन केले.

३० जून रोजी मौजे पास्टूल जवळ मोर्णा नदीच्या पात्रात बिबट्याची तीन पिले सापडली. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.१ जुलै रोजी आणखी एक पिलू सापडलं. तिथल्या नागरिकांनी वनविभागाच्या पातूर वनपरिक्षेत्रातील खानापूर नियतक्षेत्राच्या भाग २ मधील अधिकाऱ्यांना पाचारण केलं. त्यावेळी ही पिले १५ दिवस ते तीन आठवडे इतक्या वयाची असावीत. त्यांची आई जवळपासच असावी, आणि ती परतेल अशा अपेक्षेने त्यांच्या आईची वाट पाहण्यात आली. पण ती आली नाही. मग त्यांना जंगलातच पण थोडं सुरक्षित स्थळी आणून ठेवण्यात आलं. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात ही पिले होती. पिलं खूप लहान असल्याने अन्य श्वापदांकडून धोका होताच, त्यांना जगवायचंही होतं आणि शिवाय त्यांची आई आलीच तर या पिलांना सुखरुप तिच्या हवालीही करायचं होतं.

ही जबाबदारी उपवनसंरक्षक वि. ग. माने यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, प्रशिक्षणार्थी अधिकारी कुंडलिक होटे आणि सहाय्यक वनसंरक्षक नितीन गोंडवणे यांनी पार पाडली. या बछड्यांची निगा राखण्याचे काम सुरु झाले, सोबत त्यांच्या हरवलेल्या आईचा शोध घेणे. त्यांना मुद्दाम सुरक्षित पण उघड्यावर ठेवण्यात आले, की जेणेकरुन त्यांची आई त्यांना शोधत यावी आणि त्यांना घेऊन जावी. त्यासाठी त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे, नाईट व्हिजन कॅमेरे लावून सज्जता करण्यात आली. दररोज त्यांच्या आईची वाट पाहणं सुरु होतं. या सगळ्या प्रयत्नात स्थानिक ग्रामस्थ, संयुक्त वन व्यवस्थापन समितीनेही सहयोग दिला.

प्रश्न होता या बछड्यांच्या संगोपनाचा. मग वन्यजीव विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली या चौघांची देखभाल सुरु झाली. त्यांना बकरीचे दूध देण्यात येत होतं. दिवसातून तीन वेळा. ६० टक्के दूध आणि ४० टक्के पाणी या प्रमाणात. दूध आधी उकळून घेऊन नंतर गार करुन पाजले जात होते. प्लास्टीकच्या बास्केटचा वापर त्यांच्या हाताळणीसाठी केला जातो. या चौघात दोन नर आणि दोघी मादी आहे.

दरम्यान या पिलांचं करायचं काय? यासाठी उपवनसंरक्षक माने हे सतत वन्यजीव विभागाच्या संपर्कात राहून मार्गदर्शन घेत होते. त्यांच्याकडील मार्गदर्शनानुसार, १५ दिवस वाट पाहूनही आता या पिलांची आई आलीच नाही म्हणून त्यांना गोरेवाडा प्राणीसंग्रहालय प्रकल्पात ठेवण्याबाबत मुख्य वन्यजीव रक्षक नागपूर यांच्याशी पत्रव्यवहार करुन त्यांची आवश्यक परवानगी घेण्यात आली. ही परवानगी प्राप्त झाल्याने आज चारही पिले नागपूरकडे गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पात देखभालीसाठी रवाना करण्यात आली.

हे वाचल का ? जग जिंकलं ‘त्या’ माऊलीच्या मायेने!

बिबट्याची मादी ही नक्कीच तिच्या पिलांचा शोध घेत असावी, मात्र या परिसरात पडणाऱ्या पावसामुळे तिला अडचण येत असावी, असे मत वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केले. ह्या परिसरात अन्य बिबट्यांचाही वावर आहे त्यामुळे या पिलांना अन्य श्वापदांपासून जीवाला धोका असल्याने त्यांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला,असेही उपवनसंरक्षक माने यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply