Headlines

सोलापूर जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्र होणार सुरू


 सोलापूर /अब्दुल शेख  : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्र बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाच्या उपाययोजना करण्याच्या अटी व शर्तीवर जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली असून याबाबतचे आदेश जारी केले आहेत. शुक्रवारी रात्री हे आदेश जारी केले आहेत. आदेशात असे म्हटले आहे की, कंटेन्मेंट झोन आणि बफर झोन वगळता जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्रांच्या सेवा आणि ज्या सेवासाठी बोटांचे ठसे मशिनवर घ्यावयाचे आहेत, अशा सेवा सुरू करता येणार आहेत. सामाजिक अंतर आणि इतर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास बांधिल राहून परवानगी देण्यात आली आहे.

 आधार नोंदणी केंद्रावर घ्यावयाची खबरदारी

• आधार केंद्रातील सामग्री, उपकरणे आणि परिसराचे नियमित निर्जंतुकीकरण करणे आवश्यक.

• केंद्र चालक, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक.

• केंद्रात येणाऱ्या प्रत्येकांचे थर्मल स्क्रिनिंग करावे.

• केंद्रात येणाऱ्या नागरिक व केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पूर्णवेळ मास्कचा वापर करावा. फोटो काढण्यावेळी मास्क काढावा.

• केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.

• प्रत्येक आधार नोंदणी किंवा अद्ययावत झाल्यानंतर बायोमेट्रीक उपकरणे सॅनिटायझर करून वापरावी.

• केंद्रात किमान एक मीटर सुरक्षित अंतर सुनिश्चित करावे. नागरिकांना योग्य अंतरासह मोकळ्या जागेत बसवावे.

• केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना अपॉईंटमेंटशिवाय परवानगी देऊ नये.

• नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना खोकला, ताप, कफ, श्वासोच्छसाच्या अडचणी असल्यास आधार केंद्रात न येण्याबाबत फलक लावावे. 

• केंद्रात नागरिकांसाठी असलेली माहिती दर्शनी भागात लावावी.

• केंद्रातील ऑपरेटरने कोविड-19 च्या हॉटस्पॉट क्षेत्रात जाणे किंवा अशा भागातून प्रवास करणे टाळावे.

• आधार केंद्रात शिबीरे घेऊ नयेत. 

• प्रतिबंधित क्षेत्रातील गावात केंद्र चालू करू नये.

 आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *