Headlines

सोलापुरात ९३ वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त


वेळेत तपासणी आणि त्वरित उपचाराचा झाला फायदा

सोलापुरातील मुळेगाव (साईनगर) येथील ९३ वर्षांच्या आजी जबरदस्त इच्छाशक्ती, वेळेत तपासणी, योग्य निदान आणि त्वरित उपचार मिळाल्याने कोरोनामुक्त झाल्या आहेत.
घरात कमावतं कोणी नाही, एक मुलगा त्याचेही वय 63 च्या वर. दुसरी मुलगी कर्णबधीर. अशा परिस्थितीत ९३ वर्षांच्या आजींचा भाऊ सारीच्या आजाराने मयत झाला. आजीचा संपर्क भावाशी आला होता, यातूनच आजीला कोरोनाची बाधा झाली होती.

भाऊ मृत झाल्याचे तालुका प्रशासनाला समजल्यानंतर पारधी वस्तीवर वेळेत उपाययोजना केल्या. आजींचा स्वॅब १३ जूनला घेण्यात आला, त्या काळात आजीला टाकळी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या काळात त्यांना सकस आहार देण्यात आला. संघर्ष करण्याची सवय, रोगप्रतिकारशक्ती आणि जगण्याची इच्छाशक्ती यामुळे आजी घाबरल्या नाहीत. त्यांनी दाखविलेले धैर्य सर्वांना अनुकरणीय आहे.

आजीबाईंच्या इच्छाशक्तीमुळे आजाराने गंभीर स्वरूप धारण केले नाही. सिंहगड कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आजींना ठेवण्यात आले होते. या ठिकाणी वेळेवर दोनवेळा चहा, भरपेट जेवण दिले जात होते. रोज डॉक्टर तपासणी आणि रूग्णांची विचारपूस करून जात होते. डॉक्टरांनी दिलेला आधार यामुळेच रूग्णांचा निम्मा आजार हद्दपार होत आहे. आजीबाई कोरोनाला धीराने तोंड देत होत्या. १४ दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली राहिल्यानंतर शनिवारी (२७ जूनला) आजीबाई कोरोनामुक्त होऊन घरी आल्या आहेत. मला पहिल्यापेक्षा आता अधिक चांगले वाटत आहे, असे त्यांनी सांगितले.

दुपारी आयुर्वेदिक काढा आणि काही औषधे दिली जात होती, यामुळे मला आजारी असल्याचे जाणवलेच नाही. दोन वेळा जेवण करून निवांत झोप घेत होते. घरातल्यापेक्षा चांगली सोय झाली होती, फक्त एकाच गोष्टीचे वाईट वाटायचे कोंडून असल्याने ओळखीची लोकं बोलायला नसायची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *