Headlines

सोयाबीन बियाणे खरेदी व लागवड करताना काळजी घेण्याचे शिवार हेल्पलाइन कडून आवाहन

पुढील नुकसान टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय

उस्मानाबाद :- लवकरच खरीप २०२१ चा हंगाम जवळ येत आहे. शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करण्यासाठी धावपळ सुरू आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बियाणे उगवण क्षमतेबद्दल गोंधळ उडाला होता. या वर्षी प्रशासनाने योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना काही उपाय पण सुचवले आहेत.

 शेतकऱ्यांनी संबंधित कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून सोयाबीन बियाणे खरेदी केल्यानंतर सात दिवसाच्या आत सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करावी. उगवण शक्ती मध्ये ७० टक्के पेक्षा कमी बियाणे उगवून आले तर तात्काळ कृषी निविष्ठा विक्रेत्यांना संपर्क करावा. याविषयी कृषी निविष्ठा विक्रेत्यांमार्फत सुद्धा जनजागृती करण्यात येत आहे. जर ०७ दिवसाच्या आत शेतकऱ्यांनी उगवणक्षमता तपासणी केली नाही आणि तसेच बियाणे पेरले व त्यामुळे जर काही अडचण आली तर याबाबत शेतकऱ्यांना बियाणे उगवणूक संदर्भात कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही अशा आशयात विक्रेते शेतकऱ्यांकडून लेखी स्वरुपात लिहून घेत आहेत.

बियाणे हे लागवड करण्याच्या ०८ ते १० दिवसापूर्वी खरेदी करावे. सोयाबीन हे नाजूक बियाणे आहे, त्यामुळे त्याची धूळ पेरणी करू नये. उगवनशक्ती ७० टक्के पेक्षा जास्त असेल तरच लागवड करावी अन्यथा करू नये. बियाण्यास पेरणीपूर्वी बुरशीनाशक व जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन बियाणे हे अत्यंत नाजूक असते त्याचे बाह्य आवरण पातळ असते व बियाण्यातील बीजांकुर व मुलांकुर बाह्य आवरनाच्या लगत असल्यामुळे बियाणे हाताळतांना काळजी घ्यावी. सोयाबीनची पेरणी साधारणतः ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतर व जमिनीमध्ये पेरणीयोग्य ओल असतानाच करावी. पेरणी योग्य खोलीवर करावी.(मध्यम ते भारी जमिनीत पेरणी ०३ ते ०३.५० सेमी. पेक्षा जास्त खोलीवर केल्यास त्याचा उगवणशक्ती वर विपरीत परिणाम होतो.)

सोयाबीन बियाण्याची पेरणी पाणी साचलेल्या जमिनीत पाण्याचा निचरा होऊन वाफसा झाल्याशिवाय करू नये. बियाण्याची वाहतूक करताना किंवा खरेदी केल्यानंतर बियाणे घरी आणताना आणि पेरणीसाठी साठवून ठेवताना बियाण्याची पिशवी जास्त आदळआपट होणार नाही, त्याची कमीत कमी हाताळणी होईल ही काळजी घ्यावी. खरेदी करतेवेळी स्वतः बियाणे खरेदीदाराचा मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांनी बियाण्याची वाहतूक करताना बियाण्याच्या पिशवीवर खताचे पोते किंवा इतर कोणतीही वजनदार वस्तू टाकू नये. तसे झाल्यास बियाण्याची उगवणक्षमता कमी होण्याची शक्यता असते.

शेतकन्यांनी खरेदी केलेल्या बियाण्याच्या कंपनीचे नाव, लॉट क्रमाक ई बिलाप्रमाणे बॅगवर चेक करुनच घ्यावे. सदरील सोयाबिन बियाण्याची खरेदी केल्यानंतर त्या बियाण्याची लागवड करण्याच्या अगोदर उगवण शक्ती पडताळणी करण्याकरीता त्या प्रत्येक लॉटच्या एका गोणी मधून लेबल व शिलाई ज्या बाजुने आहे, ती तशीच बंद ठेवून त्याच्या विरुध्द बाजुने १०० ते १५० बिया काढाव्यात. त्याची उगवनशक्ती ७०% टक्केच्या वर असल्यास शेतकयांनी बियाण्याची लागवड करावी. जर ७०% टक्केच्या कमी उगवनशक्ती असल्यास सदरील बियाण्याची बॅग सिलबंद स्थितीत परत करण्यात यावी. परत करतांना मूळ बिल सोबत आणने अनिवार्य आहे. सर्व प्रक्रिया खरेदी बिलाच्या तारखे पासून ०७ दिवसाच्या आत करावी. त्यानंतर आपणास उगवनशक्ती बदल कोणताच आक्षेप नाही असे ग्राह्य धरण्यात येईल.

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे, अशी माहिती शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी दिली.

यासाठी कृषी विभाग,जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, राष्ट्रीय सेवा योजना, मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी एम.एच.आय , व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय उस्मानाबाद या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था सर्वांचे सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply