AgricultureBreaking News

शेतकऱ्यांनी एमआरपीनुसार करावी खतांची खरेदी – कृषी विभागाचे आवाहन

 

 सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपासाठी लागणाऱ्या खतांची खरेदी जास्तीत जास्त किरकोळ किंमतीने (एमआरपी) करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खतांच्या किंमतीबाबत अडचणी किंवा तक्रारी असल्यास जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून 0217-2726013 यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जयवंत कवडे यांनी केले आहे.


 काही खत उत्पादक कंपन्यांनी खताची दरवाढ केली आहे. खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे दर ग्रेडनिहाय वेगवेगळे आहेत. विक्रेत्याकडे जुना व नवीन दोन्ही प्रकारचा रासायनिक खत साठा आहे. विक्रेत्यांना जुना शिल्लक साठी पूर्वीच्याच दराप्रमाणे एमआरपीनुसार विकणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी करताना विक्रेत्यांकडे ई-पॉस मशिनवरील बिलाचा आग्रह धरावा. ई-पॉस मशिनवर जुन्यासाठीचे दर जुन्या दराने येतात, खरेदी केलेल्या खतांची पक्की पावती घ्यावी. शेतकऱ्यांनी ई-पॉस मशिनवरील बील, खताच्या पोत्यावरील एमआरपी आणि पक्के बील तपासून घ्यावे. याबाबत तक्रारी किंवा अडचणी असल्यास कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा कृषी विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.


 ग्रामपंचायत स्तरावर जमीन सुपिकता निर्देशांकाचे फलक लावण्यात आले असून त्यानुसार क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांचे मार्गदर्शन घेऊन जमीन सुपिकता निर्देशांकानुसार खतांचा संतुलित वापर करावा. शेतकऱ्यांनी रासायनिक खताबरोबर शेणखत, हिरवळीचे खत, लिंबोळी पेंड, जैविक खते (रायझोबियम, पीएसबी, ॲझेटोबॅक्टर) यांचा वापर केल्यास खर्चात बचत होते. केवळ रासायनिक खते न वापरता सेंद्रीय खतांचा वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होते, असेही कृषी विभागाने कळविले आहे.


 अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन श्री. कवडे यांनी केले आहे.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!