Headlines

शूरवीर बहिर्जी नाईक यांचे समाधी स्थळ राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करा – मारुती शिरतोडे

निसर्गरंग फौंडेशनच्या वतीने बानूरगड येथे वर्षारोपण


सांगली – सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यातील इतिहास प्रसिद्ध असणारे बानुरगड हे ठिकाण म्हणजे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा तिसरा डोळा संबोधला जाणारा शूरवीर बहिर्जी नाईक यांचे समाधीस्थळ असणारा ऐतिहासिक गड आहे. हे ठिकाण सध्या क वर्गातील तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झालेले असले तरी; या ऐवजी बानुरगड हे इतिहास प्रसिद्ध बहिर्जी नाईक यांचे समाधी स्थळ असणारे ठिकाण महाराष्ट्र शासनाच्या प्राचीन स्मारके व पुरातन वास्तू जतन विभागातर्फे” महाराष्ट्र शासन प्राचीन स्थळे, स्मारके, वास्तुशास्त्र विषयक अवशेष अधिनियम 1960″ नुसार गडावरील शूरवीर बहिर्जी नाईक यांची समाधी व लगतचा गड परिसर ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करावा आणि त्याचे संवर्धन व सुशोभीकरण करावे अशी तमाम महाराष्ट्रातील इतिहास प्रेमींची मागणी असल्याचे प्रतिपादन प्रगतिशील लेखक संघाचे पदाधिकारी मारुती शिरतोडे यांनी येथे केले.

सांगलीच्या निसर्गरंग फाउंडेशनच्या वतीने आषाढी वारी निमित्त ‘निसर्गराया भेटूया।चला,विठ्ठल पेरूया।।’ हे ब्रीद घेऊन सांगली ते बानूरगड असा सायकल प्रवास आयोजित केला होता. निसर्ग वाचवा, पर्यावरण वाचवा असा सायकलवरून संदेश देणारी व गावोगावी वृक्षारोपण करून निसर्गाबद्दलचे प्रबोधन करत, बानूरगडापर्यंत आलेल्या निसर्गवारीच्या समारोपप्रसंगी मारुती शिरतोडे ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी या निसर्ग वारीचे मुख्य संकल्पक, संयोजक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समितीचे सचिव कुलदीप देवकुळे,पुरोगामी चळवळीच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. नंदा पाटील, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे, रामोशी बेरड आदिवासी मुक्ती आघाडीचे नेते आनंदराव जाधव, शिक्षक संघाचे बाळासाहेब खेडकर, एस.टी कर्मचारी इंटकचे पदाधिकारी महेश मदने,प्रतिभासंपन्न ग्रामीण अभ्यासक विनायक कदम,पत्रकार प्रविण शिंदे, दिग्दर्शक शेखर रणदिवे,कार्यकारी निर्माते संतोष लोखंडे, हरहुन्नरी,लोककला अभ्यासक,कलावंत सचिन ठाणेकर, सुमित डान्स अकादमीचे सुमित साळुंखे,फ्युजन डान्स अकादमीचे सुरज वाघमोडे,दिग्दर्शक लेखक विक्रम शिरतोडे यांचेसह साहित्य, नाट्य-सिनेमा-मालिका क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना मारुती शिरतोडे म्हणाले की, बानुरगड भूपालगड म्हणून सुद्धा परिचित आहे. एकेकाळी बारा बुरुज व बारा दरवाजे असणारा साडेसहाशे हेक्टर परिसरात पसरलेला हा इतिहास प्रसिद्ध किल्ला म्हणजे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक गड होता. शूरवीर छत्रपतींच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख रामोशी समाजातील बहिर्जी नाईक यांचा मृत्यू याच गडावर झाला असून त्यांची समाधी म्हणजे प्रेरणास्थळ आहे. त्यामुळे या गडाचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे.

गडावर येण्यासाठी पायथ्यापासून गडापर्यंत रस्त्याची दुरावस्था आहे. गडाचे सध्याचे काही अवशेष जे शिल्लक आहेत ते जतन करणे गरजेचे आहे.अशा या ऐतिहासिक स्थळाचा सर्वांगीण विकास व्हावा ही जनमाणसाची भावना आहे.

दरवर्षी सांगली येथील निसर्गरंग फाउंडेशन या ठिकाणी येऊन वृक्षारोपण करते. इतर काही जनसंघटना पुढाकार घेऊन या ठिकाणी वृक्षारोपण करतात, स्वच्छता करतात ही निश्चितच कौतुकास्पद आहे. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत जाणता राजा छत्रपती शिवाजी यांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेचा प्रमुख गुप्तहेर सल्लागार व स्वराज्यातील तीन हजार गुप्तहेरांचा प्रमुख असलेला शूरवीर बहिर्जी नाईक म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा आहे. बलाढ्य अशा हिंदवी स्वराज्य निर्मितीचा पाया असलेल्या इतिहास प्रसिद्ध शूरविराचे समाधी स्थळ दुर्लक्षित राहणे ही बाब खचितच बरोबर नाही. शासनाने ,सांगली जिल्हा परिषदेने या स्थळाचा विकास करण्यासाठी अग्रक्रमाने पुढाकार घ्यावा; अशी मागणी इतिहास अभ्यासक प्रेमींची आहे.यावेळी निसर्गरंग फांऊंडेशन ने गडावर वृक्षारोपण केले. या सायकल रॅलीच्या समारोपाचे स्वागत व प्रास्ताविक कुलदीप देवकुळे यांनी केले तर आभार सुमित साळुंके यांनी मानले.

Leave a Reply