Breaking NewsPolitics

शिक्षक मतदार संघाततून प्रा.सुभाष जाधव तर पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड,श्रीमंत कोकाटे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा.- कॉ.नरसय्या आडम मास्तर

 

सोलापूर /दत्ता चव्हाण  –  महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून त्यासाठी १ डिसेंबर २०२० रोजी मतदान होत आहे. यासाठी शिक्षक मतदारसंघातून प्रा.सुभाष जाधव  यांना प्रथम पसंदी चे तर पदवीधर मतदारसंघातून मा.अरुण लाड प्रथम पसंदी तर श्रीमंत कोकाटे यांना दुसऱ्या पसंदीचे मते देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन  माकप चे राज्य सचिव कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी केले.

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. भाजपच्या केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारची आणि जनतेची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचे प्रयत्न चालू ठवले आहेत. भाजपला सत्ता स्थापन करता न आल्याने तो पक्ष महाराष्ट्राशी सूडबुद्धीने वागत आहे.  देशभरातील फॅसिस्ट स्वरूपाचे हल्ले करून नागरिकांची जीविका, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार त्या पक्षाचे केंद्र सरकार पायदळी तुडवत आहे. बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा  निवडणुकीत भाजपने अत्यंत विखारी असा धर्मांध प्रचार करून जनतेत जात-धर्माच्या आधारे फूट पाडण्याचा प्रयत्न केला. हर एकनिवडणुकीत भाजप आपला फॅसिस्ट अजेंडा पुढे करत भांडवली आणि मनुवादी विचारसरणी रुजवण्याचा प्रयत्न करत आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्या पक्षाचे हे मनसुबे धुळीला मिळाल्यानंतर आता ही फुटीर विचाराची बीजे हा पक्ष विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा समाजात पेरू पहात आहे. 

छ. शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदी समाजसुधारकांच्या स्वप्नातील महाराष्ट्र प्रत्यक्षात आणण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ हुतात्म्यांनी प्राणाचे बलिदान दिले. त्या पुरोगामी परंपरेचे पाईक असणारे आणि शेतकरी, कामगार, दलित, अल्पसंख्याक, महिला यांच्या हक्कांची जाणीव असणारे, भाजपच्या धर्मांध विचारधारेला कट्टर विरोध करणारे उमेदवार विधान परिषदेच्या या निवडणुकीत निवडून गेले पाहिजेत अशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने शिक्षक मतदारसंघात प्रा. डॉ. सुभाष जाधव यांना पाठिंबा दिला आहे. अर्थशास्त्राचा गाढा व्यासंग असलेले प्रा. डॉ. सुभाष जाधव हे प्राध्यापक- विद्यार्थ्यांपासून शेतकरी आणि ऊसतोडणी मजूर आणि वाहतूकदारांचे संघटन करत त्यांच्या हक्कांसाठी लढत आलेले आहेत. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदारांनी त्यांना प्रथम पसंतीचे मत देऊन भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन माकपची राज्य कमिटी करत आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातही भाजपाच्या  उमेदवाराचा पराभव झाला पाहिजे, अशी माकपच्या राज्य कमिटीची भूमिका आहे. या मतदारसंघात क्रांतिसिंह कॉ. नाना पाटलांची आणि क्रांतिअग्रणी जी. डी. (बापू) लाड यांची परंपरा पुढे चालवत असलेले श्री. अरूण लाड हे निवडणूक लढवत आहेत. ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणारे ते सक्षम उमेदवार आहेत. त्यांची ही क्षमता आणि त्यांचा पुरोगामी कार्याचा वारसा ध्यानात घेता त्यांना मतदारांनी प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

याच मतदारसंघात महाराष्ट्रातील एक पुरोगामी विचारांचे खंदे पुरस्कर्ते विचारवंत श्री. श्रीमंत कोकाटे हेही निवडणूक लढवत आहेत. श्री. कोकाटे हे गेली कित्येक वर्षे रा.स्व. संघाच्या प्रतिगामी विचारांसोबत वैचारिक आणि सांघिक दृष्ट्या लढत आहेत. त्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या, पक्षाला मानणाऱ्या जनसंघटनांच्या अनुयायांनी द्वितीय पसंतीचे मतदान करावे, असे आवाहन माकप करत आहे.

विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झालाच पाहिजे, अशी पक्षाची  भूमिका आहे. त्याला अनुसरून पक्षाच्या राज्य सचिवमंडळाने हा निर्णय घेतला आहे.अशी माहिती प्रसारमाध्यमांना ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!