Breaking News

शहीद सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

साकुरी गावात पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासह हजारो नागरिकांनी घेतले भावपूर्ण अंतिम दर्शन
 शहीद सचिन मोरे ‘अमर रहे अमर रहे’ ‘भारत माता की जय’ घोषणा आणि साश्रू नयनांनी वीरपुत्राला अखेरचा निरोप
मालेगाव, दि. 27 : इंजिनिअरिंग रेजिमेंट-115 मध्ये अभियंता पदावर कार्यरत असलेले शहीद वीरजवान सचिन विक्रम मोरे यांच्यावर त्यांच्या मूळगावी साकुरी झाप  (ता.मालेगांव जिल्हा नाशिक) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, कृषि तथा माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ.सुभाष भामरे, डॉ.भारती पवार, आमदार सुहास कांदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस अधिक्षक डॉ.आरती सिंग यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद जवान सचिन मोरे यांना श्रध्दांजली वाहिली. सैन्यदलाच्या वतीने  प्रारंभी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.  राज्य शासनाच्या वतीने  पालकमंत्री छगन भुजबळ व कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहिली.

शहीद जवानाच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री भुजबळ
हिमालयाच्या कुशीत ज्या ठिकाणी पाणी व रक्त गोठून जाते अशा ठिकाणी भारतमातेच्या संरक्षणासाठी आमचे जवान सदैव कार्यरत आहेत, ते सीमेवर आहेत म्हणून आज आपण इथे स्वातंत्र्य भोगत आहोत. आज युद्धजन्य परिस्थिती उभी ठाकली असतांना आमचे नवजवान चिनी गनिमाला ठणकावून सांगताहेत, “खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या…” अशा भावना उराशी बाळगून आपले सैनिक आज देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहेत,  अशा सर्व सैनिकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अभिवादन केले. शहीद जवान सचिन मोरे यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र शासनासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीनेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली.

शहीद जवान मोरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : कृषिमंत्री दादाजी भुसे

गलवान खोऱ्यात आपल्या सहकार्यांचा जीव वाचवितांना वीरमरण आलेले शहीद जवान सचिन विक्रम मोरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. याचा भारतीय लष्करातर्फे निश्चित बदला घेतला जाईल, आणि हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केले. शहीद सचिन विक्रम मोरे यांना सैन्य दलात भरती करणारे वीरपिता विक्रम मोरे व वीरमाता जिजाबाई मोरे यांचा मालेगांव तालुक्यालाच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राला अभिमान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

वीरपुत्राला अखेरचा निरोप
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील साकुरी या गावचे सचिन मोरे हे 17 वर्षापासून भारतीय सेनेत कार्यरत होते. ते सैन्यदलात अभियंता पदावर कार्यरत होते. दोन्ही देशांच्या सीमेवर पूल व रस्ते बनवण्याचे काम सुरू असतांना अचानक चीनकडून गलवाण नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे सोबतच्या काही जवानांना वाचविण्याच्या प्रयत्नात सचिन मोरे यांना वीरमरण आले होते. शुक्रवारी रात्री त्यांचे पार्थिव पुणे येथे आणल्यानंतर तेथे लष्कराच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. तेथून त्यांचे पार्थिव हे त्यांच्या मालेगाव येथील साकुरी मूळगावी शनिवारी सकाळी आणण्यात आले. कोरोना महामारीची छाया असतानाही आपल्या परिसरातील लाडक्या जवानाला भावपूर्ण निरोप  देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी गावकऱ्यांनी ‘भारत माता की जय’ ‘अमर रहे’ यासारख्या घोषणा देऊन वीरपुत्रांला दुपारी 12:00 वाजता अखेरचा निरोप दिला.
शहीद जवान सचिन मोरे यांच्या पश्चात वडील विक्रम मोहन मोरे, आई जिजाबाई विक्रम मोरे, पत्नी सारिका, मुलगी आर्या, अनुष्का व अवघ्या सात महिन्याचा मुलगा कार्तिक तर भाऊ योगेश व नितीन असा परिवार आहे. अलिबाग येथे 2003 मध्ये झालेल्या सैनिक भरतीमध्ये सैन्यदलात भरती झालेला शहीद जवान सचिन मोरे सध्या एस.पी.115 रेजिमेंटमध्ये कार्यरत होता. सैनिकी सेवेत 17 वर्ष पूर्ण झाल्याने नुकताच फेब्रुवारी महिन्यात आपल्या मूळगावी आला होता. सेवेचा कार्यकाळ वाढवून मिळणार असल्याने आपण यापुढेही देशसेवा करणार असल्याच्या भावनाही त्यांनी कुटुंबियांकडे व्यक्त केल्या होत्या. मनमिळावू स्वभावाचे शहीद जवान सचिन मोरे अचानक निघुन गेल्यामुळे संपूर्ण साकुरीसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!