Breaking News

शहीद जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात चिंचणेर निंब येथे अंत्यसंस्कार

सातारा :  शहीद जवान सुजित किर्दत यांच्या पार्थिवावर आज चिंचणेर निंब येथे पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, कमांडर स्टेशन हेडक्वार्टर, कोल्हापूरचे कर्नल पराग गुप्ते  यांनी शहीद जवान सुजित किर्दत यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

 शहीद जवान सुजित किर्दत यांना मानवंदना देऊन कुटुंबिय आणि ग्रामस्थ यांनी त्यांच्या  पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. चौकाचौकात आदरांजलीचे फ्लेक्स लावले होते.  ‘अमर रहे, अमर रहे सुजित किर्दत अमर रहे, भारत माता की जय,’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचली.

सैन्य दल व पोलिस दलामार्फत पुष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आलीतसेच हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. पिता नवनाथ, पत्नी सुवर्णा, मुलगा आर्यन, मुलगी इच्छा, भाऊ अजित यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. शहीद सुजित किर्दत यांचा मुलगा आर्यन यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, साताऱ्याचे गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्यासह लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!