विठुरायाची दर्शनभेट झाल्याशिवाय शिवछत्रपती रायगड चढणारच नाहीत – संदीप महिंद

पंढरपूर/नामदेव लकडे ::-आषाढी एकादशीस या शिवविचार-कृतीद्रोही शासनाने रायगडाहून पायी चालत आलेल्या शिवरायांच्या पादुकांना विठुरायाच्या दर्शनास पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश करु दिला नाही. मोगलाई माजवलेल्या पंढरपुरात तर सोडाच आता तुघलकी पद्धतीने दुर्ग रायगडही चढू दिला नाही.आता शिवछत्रपती पंढरपुरात सन्मानाने जाऊन विठुरायाशी आपले अंतरीचे हितगुज सांगून मगच राजधानी रायगड चढतील आणि तोपावेतो आम्हीं शिवभक्त आत्मक्लेश म्हणून कठोर उपवास करणार असल्याची स्पष्टोक्ती शिवरायांच्या पालखीतील हुजरे संदीप महिंद यांनी केली.

टाळेबंदी घोषित होताच लगेचच २८ मार्चपासून २९ जूनपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, २ माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, विद्यमान राज्य मंत्रीमंडळातील ९ मंत्री, १३ खासदार, ३१ आमदार तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांसह ७५-८० लोकांच्या भेटी; वेगवेगळे ११७ पत्रव्यवहार करुनही शिवछत्रपतींच्या पालखीविषयी अनास्था दाखविणाऱ्या या शासनाचा व पुढाऱ्यांच्या ढोंगीपणाचा निषेध करताना रायगड ते पंढरपुर पायी चालत गेलेल्या शिवभक्तांनी आत्मक्लेश म्हणून भूगाव, (ता. मुळशी, जि. पुणे) ग्रामपंचायतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्तीस्मारकासमोर उपोषण करत असताना त्यांनी आज दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधला.

शिवरायांचे विचार जाणून घेऊन आचरणात आणण्यापेक्षा त्यांच्या नावाने मतांचा बाजार मांडणारी ही गेंड्याच्या कातडीची राजकीय व्यवस्था आहे.आताही शिवरायांच्या नावानेच मते मागून सत्तासोपान चढलेले मुख्यमंत्र्यासह सर्वच पक्षांचे मंत्री व पुढारी पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका आल्यात हे माहित असूनही, त्यांना विसरुन-मागेच ठेवून स्वतः सगळे थेट मंदिरात घुसले. शिवरायांच्या अस्मितेपेक्षाही त्यांना स्वतःची खोटी प्रौढी महत्त्वाची वाटली.


शासकीय म्हणवल्या गेलेल्या पूजेचे सोपस्कार कशा दांभिक पद्धतीने उरकले गेले, त्याचेही अनेक किस्से आता उघड झाले आहेत. अशा शासनाला स्वतःची उरली-सुरली अब्रू वाचवायची असेल तर शिवरायांच्या पादुकांना सन्मानाने व अतीव आदराने पंढरीत नेऊन नगरप्रदक्षिणेसह सर्व प्रथा-परंपरा पाळून मगच विठुरायाच्या मंदिरात न्याव्या लागतील. भूवैकुंठीचे आराध्य भगवान पांडुरंगाच्या दर्शनभेटीशिवाय कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज रायगडी जाणारच नाहीत.जोपर्यंत शिवछत्रपती राजधानी रायगड चढत नाहीत, तोपर्यंत आम्हीही आमचा आत्मक्लेश उपवास थांबवणार नसल्याचा कणखर इशारा श्री. महिंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज दिला.

शासनाशी असलेला हा संघर्ष केवळ वैचारिक व सैद्धांतिक पातळीवरील असून प्रचलित घाणेरड्या राजकारणाशी त्याचा कसलाही संबंध जोडू नये, अशी विनंतीही त्यांनी याप्रसंगी सगळ्याच प्रसिद्धी माध्यमांना व महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना केली.कालपासून ही सर्व मुले ऊन, वारा, पावसात आपली सश्रद्ध निष्ठा शिवरायांच्या चरणी अर्पण करण्याचा अट्टाहास व आग्रह प्रामाणिकपणे करत आहेत. शिवभक्तांच्या या शिवबा-विठोबा भेटीच्या आग्रहाच्या मागणीस समजून घेण्यासाठी मुळशी तालुक्याचे तहसीलदार श्री. अभय चव्हाण स्वतः जातीने आज भेटायला गेले. या सगळ्यांची अत्यंत आस्थेने व आपुलकीने चौकशी करुन प्रशासनास व वरिष्ठांना याविषयात सगळा निरोप पोहचवून योग्य मध्यस्थी करुन शिवरायांची ज्वलंत अस्मिता व सन्मान जपणारा तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

हे ही वाचा – बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

Leave a Reply