Headlines

लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या कामांचा पडला विसर -शेवते – खेडभोसे रस्त्याची दुरवस्था


शेवते – खेडभोसे रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे.

शेवते – खेडभोसे रस्त्यावर शेवते ग्रामपंचायतीने मागील वर्षी 2 किमी पर्यंत मुरुम टाकला होता, मात्र यंदा रस्त्याची डागडुजी न केल्याने ग्रामस्थ, शेतकऱ्यांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे.

पंढरपूर/नामदेव लकडे – लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे पंढरपूर तालुक्यातील शेवते ते खेडभोसे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने ग्रामस्थांना चिखलातुन रस्ता शोधावा लागत आहे. शेवते ते खेड भोसे हे पाच किलोमीटर अंतर आहे. या पाच किलोमीटर पैकी शेवते गावाकडून दोन किलोमीटर खडीकरण आहे. तर खेडभोसे गावाकडून दोन किलोमीटर रस्ता डांबरीकरण करण्यात आले आहे.
आता खेडभोसे शीव ते पवार वस्ती ह्या एक किलोमीटर रस्त्याचे काम बाकी आहे. या एक किलोमीटर मध्ये साधे खडीकरण सुध्दा नाही. या रस्त्याने वाहनच काय पण माणसांना देखील व्यवस्थित चालता येत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यातच सध्या या परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने या रस्त्यावर पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकाना खड्डयाचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.निवडणूका आल्या कि या भागातील लोकप्रतिनिधी या रस्त्याने येतात मात्र एकदा निवडणूका झाल्या कि इकडे फिरकत सुध्दा नाहीत. शेवते ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांनी पुढाकार घेऊन या रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवावा अशी मागणी ग्रामस्थातुन होत आहे.

Leave a Reply