Headlines

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मानद डी.लिट पदवी प्रदान

मुंबई : सार्वजनिक जीवनात गेली ६० वर्षे केलेल्या समाजसेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज एका विशेष दीक्षांत समारोहात डी.लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.

राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांना राजभवन येथे ही मानद पदवी समारंभपूर्वक देण्यात आली.

डी. लिट. ही सन्माननीय पदवी घेण्याची आपली योग्यता नाही असे आपण मानतो, तरी देखील आयोजकांच्या प्रेमाखातर आपण ही पदवी विनम्रपणे स्वीकारीत असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. आपण स्वत:ला ‘राज्य सेवक’ समजतो व त्याच भावनेने काम करीत आहे असे त्यांनी सांगितले.

भारतीय संस्कृती चीर पुरातन व नित्यनुतन आहे. नव्या शैक्षणिक धोरणात भारतीय संस्कृतीसह, संस्कार व मातृभाषेतील शिक्षणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. प्राथमिक शिक्षण शक्यतोवर मातृभाषेतून दिले जावे यावर नव्या शैक्षणिक धोरणाचा भर आहे असे त्यांनी सांगितले.

महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त करताना चारित्र्यसंपन्न युवक घडविण्यासाठी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार दिले पाहिजे असे राज्यपाल म्हणाले. त्यासोबतच शिक्षकांनी आपल्या आचरणातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारतीय संस्कृतीने नेहमीच विश्वातील चांगल्या गोष्टीचा स्वीकार केला आहे असे सांगून विकास सर्वसमावेशक राहिल्यास देश प्रगतीची शिखरे पादाक्रांत करेल, असा विश्वास कोश्यारी यांनी व्यक्त केला.

श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.विनोद टिब्रेवाला आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यापीठा अंतर्गत चालणारे शैक्षणिक उपक्रम व भावी योजनांबद्दल यावेळी माहिती दिली.

राजस्थान सेवा संस्थेच्या शिक्षण संचालिका वनश्री वलेचा यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी राजस्थानी संस्थेचे विश्वस्त रमाकांत टिब्रेवाला, सुनिल पटोडीया, विनोद दालमिया आदि उपस्थित होते
.

Leave a Reply