राजुरी येथे ख्वाजा गरीब नवाज कोविड केअर सेंटर सुरू

राजूरी येथील दारुल उलूम हिलालिया गरीब नवाज मदरसा ट्रस्टने घेतला पुढाकार 

राजुरी – हिलालिया फौंडेशन, राजुरी तसेच आमदार अतुल बेनके यांच्या विशेष सहकार्याने राजुरी येथे 25 बेडचे ख्वाजा गरीब नवाज कोविड क्वारंटाईन  सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती मदरसा कमिटीचे अध्यक्ष मुबारक तांबोळी यांनी दिली.

         या कोविड सेंटरचे उद्घाटन जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी हाजी रज्जाक कुरेशी,माजी सभापती दीपक आवटे,सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके ग्रामपंचायत सदस्य एम.डी.घंगाळे, एकनाथ शिंदे, शाकीर चौगुले, जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीचे अध्यक्ष सादिक आतार, राजुरी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जाकिर पटेल, संकल्प युवा संस्थेचे अध्यक्ष कलीम पटेल, अंजुमन ट्रस्टचे अध्यक्ष रईस चौगुले, मेहबूब काझी, प्रा. अशफाक पटेल इ.मान्यवर उपस्थित होते.

           करोना काळात रुग्ण सेवेसाठी हिलालिया मदरसा ट्रस्टने उभे केलेले ख्वाजा गरीब नवाज कोविड क्वारंटाईन सेंटर चे कार्य आदर्श असून या सेंटरला सर्व काही मदत व सहकार्य केले जाईल असे मनोगत आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.               

यावेळी जुन्नर तालुका मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने पंचवीस बेड व गाद्या, हाजी अब्दुल रजाक कुरेशी यांनी बेडशीट -चादर,  हाजी गुलामनबी शेख यांच्या प्रयत्नातून गोळ्या औषधांची व्यवस्था, संकल्प अन्नपूर्णा केंद्राकडून दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मदरसा कमिटीचे अध्यक्ष मुबारक तांबोळी यांनी सांगितले.

          सदर कोविड क्वारंटाईन सेंटर कार्यान्वित करण्यासाठी हिलालिया फौंडेशनचे संस्थापक मुस्लिम धर्मगुरु हाजी गुलजारूद्दीन चिश्ती,  ग्रामपंचायत राजुरी, मुसलमान जमात राजुरी व मुंबई विभाग, जुन्नर तालुका मुस्लिम सेवा समिती यांचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचे ग्रामपंचायत सदस्य शाकीर चौगुले यांनी सांगितले. 

          यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वयंसेवी डॉक्टर्स पथकातील डॉ.स्वप्नील कोटकर, डॉ.गेनुजी शिंदे, डॉ.संदीप काकडे, डॉ. अमीर जमादार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुसलमान जमात राजुरीचे अध्यक्ष जाकीर पटेल यांनी केले. तर आभार रईस चौगुले यांनी मानले.

Leave a Reply