माॅब लिंचींग च्या प्रतिबंधासाठी सांगलीत विशेष कृती दलाची स्थापना

 


सांगली/सूहेल सय्यद – मा. सर्वोच्च न्यायालयाने माॅब लिंचींग म्हणजेच जमाव जमवून किंवा समुदायाकडून एखाद्या व्यक्तीची हत्या घडवून आणणे यासारख्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पोलीस नोडल अधिकारी व त्यांचे सोबत एक सहाय्यक पोलिस अधिकारी यांची नियुक्त नियुक्ती करण्याबाबत निर्देश दिले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने देखील या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते,  त्याप्रमाणे सांगली जिल्हा पोलिस दलाचे वतीने सांगली जिल्ह्यामध्ये विशेष कृती दलाची नुकतीच स्थापना करण्यात आली असून विशेष कृती दलाचे नोडल ऑफिसर मा. पोलीस अधीक्षक श्री दीक्षित गेडाम हे असून सहाय्यक नोडल ऑफिसर म्हणून पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.


सामाजिक कार्यकर्ते मुनीर मुल्ला यांनी माहिती अधिकार अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सदर माहिती प्राप्त झालेली आहे. गेल्या चार ते पाच वर्षात देशांमध्ये अल्पसंख्यांक व दलित समाजातील लोकांना लक्ष्य करून माॅब लिंचींग सारख्या अनेक दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, अशा वारंवार घडणार्‍या घटना नंतर देशातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली होती, या याचिकांवर 17 जुलै 2018 रोजी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने वरील निर्देश केंद्र सरकारला दिले होते.

                                                                        सदर विशेष कृती दलामध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व एक पोलिस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहेत तसेच सदर कृती दलातील सदस्यांची महिन्यातून एक वेळा बैठक घेऊन पोलीस ठाणे हद्दीतील कोणत्या व्यक्तीकडून हिंसात्मक कारवाया, द्वेष पसरवणे, खोट्या बातम्यांच्या अफवा पसरवणे, प्रक्षोभक वक्तव्ये करणे अशी कृती करण्याची शक्यता आहे अशा व्यक्ती व अशा घटनांबाबत आगाऊ गुप्त माहिती प्राप्त करून जमावाकडून हिंसात्मक कृत्य घडून निष्पाप व्यक्तींचे बळी जाणार नाही याची दक्षता घेणे संदर्भात मार्गदर्शन करण्यात येते.


पोलीस ठाणे हद्दीतील संमिश्र वस्ती, विरळ वस्ती व संवेदनशील ठिकाणे बीट मार्शल पेट्रोलिंग नेमून माॅब लिंचींग सारख्या घटना घडू नयेत या करीता वेळोवेळी बीट मार्शल अंमलदार यांना सूचना देण्यात येत असतात.


                                                                      गावांमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन समाजामध्ये वाद विवाद निर्माण झाला असल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस ठाणे येथे कळवणेबाबत पोलीस ठाणे स्तरावर पोलीस पाटील यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती जन माहिती अधिकारी तथा पोलीस उप अधीक्षक (सांगली मुख्यालय) आर. आर. शेळके यांचे मार्फत देण्यात आलेली आहे.

                                                                                 विशेष कृती दल स्थापन करण्याच्या निर्णयाचा दलीत व अल्पसंख्यांक समाजामध्ये स्वागत करण्यात येत आहे.याबद्दल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. थोड्या उशिराने का होईना पण जिल्हा पोलीस प्रशासनाने अल्पसंख्यांक व दलित समाजातील लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगला निर्णय घेतला आहे .-   मुनीर मुल्ला , अध्यक्ष मुस्लिम अधिकार आंदोलन,महाराष्ट्र 

Leave a Reply