Headlines

भिवंडी तालुक्यातील कांबेमध्ये गेल्या ७-८ महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई

कांबे गावातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत

भिवंडी तालुक्यातील कांबे गावामध्ये गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई सुरु आहे. यासंदर्भात शासनाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणतीच दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन यांनी कांबे गावात होणारा पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात कपात केल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच ग्रामपंचायत कांबे च्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ कनेक्शन असल्याने व त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप “पाणी हक्क संघर्ष समिती, कांबे” चे मुख्य निमंत्रक अजिंक्य गायकवाड यांनी केला आहे.

गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाने २०१५ साली कांबे गावामध्ये एक करोड सात लाख रुपयांची निधी नवीन पाण्याची टाकी व गावात नवीन लाईन टाकण्यासाठी मंजूर करण्यात आली होती. हे काम अद्याप पर्यंत अपूर्णच असून नवीन टाकी व नवीन लाईन सुरु करण्यात आलेली नाही. तरीसुद्धा ग्रामपंचायत कांबे व पंचायत समिती चे पाणीपुरवठा अधिकारी यांनी संगनमताने सदर ठेकेदाराला सुमारे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम देऊ केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा आरोप गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 स्टेम वॉटर कडून सुद्धा कांबे गावाच्या या समस्येवर दुर्लक्ष केला जात असून गावातील नागरिकांना दररोज पाणी विकत आणावे लागत आहे व महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. या पाणी प्रश्नासंदर्भात शासनाने तातडीने उच्च स्तरीय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी गावाकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच येत्या आठवडाभरात या समस्येवर तमाम गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाणी हक्क संघर्ष समिती कांबे चे मुख्य निमंत्रक अजिंक्य गायकवाड यांनी दिला आहे.

Leave a Reply