भाजपची दार उघड आंदोलनातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न, वंचित बहुजन आघाडीने केली घणाघाती टीका

भाजपने आज दार उघड उद्धवा दार उघड हे घंटानाद आंदोलन केलं.
पंढरपूर/नामदेव लकडे – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील मंदिरे पाच महिन्यांपासून बंद होती. अनलॉक 3 मध्ये केंद्र शासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली. मात्र महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने अद्याप मंदिरे उघडली नाहीत. राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने विश्व वारकरी सेनेच्या मंदिरप्रवेश आंदोलनाला पाठिंबा दिला.
31 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश केला जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या मंदिर प्रवेश आंदोलनाला राज्यातून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे . याच पार्श्वभूमीवर भाजपने आज दार उघड उद्धवा दार उघड हे घंटानाद आंदोलन केलं.भाजपच्या या आंदोलनावर वंचित बहुजन आघाडीने जोरदार टीका केली आहे. ‘हे आंदोलन मंदिराचे दार उघडण्यासाठी नाही तर सत्तेचे दार उघडण्यासाठी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी केली आहे. भाजपचे मंदिर उघडण्याचे आंदोलन हे राजकारणासाठी आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन हे श्रद्धेपोटी आणि वंचितांचे हक्क न्याय मिळवून देण्यासाठी आहे. भाजपने आजपर्यंत धर्म मंदिरे यावरच आपली राजकीय पोळी भाजली,’ असा घणाघात वंचित आघाडीकडून करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेश आंदोलन पुकारल्यानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळेच त्यांनी दार उघड उद्धवा दार उघड हे आंदोलन घेतलं. मात्र हे आंदोलन सत्तेचे दार उघडण्यासाठी असल्याचा घणाघात आनंद चंदनशिवे यांनी पंढरपूरमध्ये बोलताना केला आहे.

Leave a Reply