Breaking News

बॉक्‍स पुलाऐवजी पाइप टाकून केला रस्ता; पंढरपूर-सातारा महामार्गाच्या कामातील प्रकार

पंढरपूर/नामदेव लकडे ::- म्हसवड-वाखरी (ता. पंढरपूर) दरम्यानच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. या प्रकारानंतर याच रस्ते बांधकाम कंपनीने राज्य रस्ते विकास मंडळाने ठरवून दिलेल्या कामामध्ये फेरबदल केल्याचा प्रताप ही आता उघड झाला आहे. मजबूत पुलाऐवजी केवळ पाइप टाकून काम केले आहे. याप्रकरणी पिलीव येथील सामाजिक कार्यकर्ते अनिकेत देशमुख यांनी एमएसआरडीकडे तक्रार केल्यानंतर कंपनीचा हा बेबनाव समोर आला आहे. याप्रकरणी एमएसआरडीने संबंधित रोडवेज सोल्युशन बांधकाम कंपनीला कायदेशीर नोटीस दिली आहे. सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर कंपनीचे पितळ उघडे पडले आहे. पंढरपूर-सातारा या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गामध्ये रुपांतर झाले आहे. त्यानुसार सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. म्हसवड ते पंढरपूर दरम्यानच्या रस्त्याचे काम रोडवेज सोल्युशन बांधकाम कंपनीला देण्यात आले आहे. सिमेंट रस्त्याबरोबरच छोट्यामोठ्या पुलांची ही कामे याचा कंपनीला देण्यात आली आहेत. 

याच मार्गावर तांदूळवाडी (ता. माळशिरस) गावापासून पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर छोटासा ओढा आहे. त्यावर बॉक्‍स कलव्हर्ट पूल बांधण्याचे टेंडरमध्ये नमूद आहे; परंतु कंपनीने राज्य रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करत चक्क बॉक्‍स कलव्हर्टऐवजी पाइप कलव्हर्ट टाकून काम पूर्ण केले आहे. कंपनीने टेंडरनुसार काम न करता शासनाची आणि रस्ते विकास मंडळाची दिशाभूल केल्याची गंभीर बाब, पिलीव येथील अनिकेत देशमुख यांच्या लक्षात आली. त्यांनी पुणे येथील राज्य रस्ते विकास मंडळाच्या कार्यालयाशी पत्र व्यवहार करून ही बाब त्यांच्या ही निदर्शनास आणून दिली. ही गंबीर बाब अधिकाऱ्याच्या लक्षात येईपर्यंत कंपनीने काम पूर्ण करून रस्ताही केला आहे. 

श्री. देशमुख यांनी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर रस्ते विकास मंडळाने प्रकल्प अथोरिटी दिलेल्या पंढरपूर येथील स्टुप कन्सलटन्सीकडून प्रत्यक्ष स्थळ पाहाणी अहवाल मागवून घेतला. यामध्ये चॅनल नंबर 33140 येथील पुल बॉक्‍स कलव्हर्टऐवजी पाइप कलव्हर्ट केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यानुसार पुणे येथील राज्य रस्ते विकास मंडळाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी सदरच्या ठिकाणी टाकलेले पाइप काढून बॉक्‍स कलव्हर्ट पूल करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाची आणि रस्ते विकास मंडळाची दिशाभूल करणार्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही श्री. देशमुख यांनी केली आहे. 

चौकट-आर्थिक फायद्यासाठी चुकीचे काम 

म्हसवड-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. तांदुळवाडी नजीक बॉक्‍स कनव्हर्ट पूला ऐवजी सिमेंट पाइप टाकून काम उरकण्यात आले आहे.यामध्ये रोडवजे सोल्यूशन कंपनीने आर्थिक फायद्यासाठी चूकीचे काम केले आहे. अधिकारी आणि ठेकेदारामध्ये मिलीभगत आहे. कंपनीवर गुन्हा दाखल करावा – अनिकेत देशमुख, सामाजिक कार्यकर्ते, पिलीव

चौकट-पुल नंतर उभारण्याचे आदेश 

म्हसवड ते वाखरी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी गावानजीक बॉक्‍स कनव्हर्ट पूल उभारण्याचे टेंडरमध्ये स्पष्ट असतानाही रोडवेश सोल्युशन कंपनीने त्या ठिकाणी पाईप कलव्हर्ट काम केले आहे. चुकीच्या पध्दतीने काम करणे गंभीर आहे. कंपनीने केलेल्या कामाची माहिती वरिष्ठ कार्यालयाला दिली आहे. शिवाय सदरच्या ठिकाणी बॉक्‍स कनव्हर्ट पूल उभारण्याचे आदेशही कंपनीला दिले आहेत. तातडीने हे काम पूर्ण केले जाणार आहे   – अजय भोसले, कार्यकारी अभियंता, एमएसआरडी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!