barshiBreaking Newsyuva sanvaad

बार्शी टेक्सटाईलच्या कामगारांवर उपासमारीची वेळ 400 कुटुंबांचा प्रश्न , कामगार दिनी तर मिळणार का न्याय ?

 



बार्शी /अब्दुल शेख  – केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळातर्फे बार्शी शहरात असलेली बार्शी टेक्सटाईल मिल मागील एका वर्षापासून बंद आहे. केंद्र सरकारने अनलॉक आणि महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अंतर्गत उद्योग सुरू केले होते. मात्र कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र शासनाने 14 एप्रिलपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर उद्योग बंद केले. भारत सरकारच्या केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळातर्फे दिनांक 30 मार्च 2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील अचलपूर , मुंबई येथील टाटा व बार्शी येथील सूत गिरण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अवघ्या दहा दिवसात केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या राज्य शासनाच्या आदेशाने गिरण्यांचा भोंगा पुन्हा एकदा थांबला.

भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी 23 मार्च 2020 रोजी देशात टाळेबंदी जाहीर केली. सरकारच्या आदेशाने बार्शीतील टेक्सटाईल मिल बंद झाली. तब्बल एका वर्षानंतर 30 मार्च रोजी सुरू झालेली मिल 14 एप्रिल पासून पुन्हा एकदा बंद झाली. त्यानंतर 14 एप्रिल पासून प्रत्यक्षात उत्पादन बंद झाले असून प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे काम मात्र सुरू आहे.

मार्च 2020 मध्ये ज्यावेळेस मिल बंद करण्यात आली . त्यावेळेस मिलमध्ये 175 कायम , 60 बदली व 140 कंत्राटी व ज्येष्ठ कामगार मिळून एकूण 420 कामगार कामाला होते.आज घडीला कंपनीच्या मस्टर नुसार 320 कामगार आहेत .त्यामध्ये बदली , कायम आणि कंत्राटी कामगारांचा समावेश आहे.


कामगारांना पगार फक्त 50 %

मार्च , एप्रिल , मे 2020 या कालावधीत मार्च महिन्याच्या हजरी नुसार सर्व कामगारांना 50% पगार देण्यात आला.त्यानंतर जून 2020 पासून फक्त कायमस्वरूपी कामगारांना मार्च 2020 च्या हजेरी नुसार जे काही दिवस भरले असतील त्याच्या 50% पगार देण्यात येत आहेत.
उदारणार्थ – जा कामगाराचे मार्च 2020 मध्ये दहा दिवस भरले असतील ,त्यांना पाच दिवसाचा.ज्या कर्मचाऱ्यांचे 20 दिवस भरले असतील त्यांना दहा दिवसाचा.


कामगारांची सद्यस्थिती

50 % नुसार मिळणार्‍या तुटपुंज्या पगारीवर घराचा आर्थिक गाडा चालवणे शक्य नसल्याने अनेक कामगार सध्या रिक्षा चालवणे , इतर कारखान्यांमध्ये कामाला जाणे , काही महिला कामगार स्वयंपाक आणि धुण्या -भांड्यांची कामे करत आहेत. काही लोक शेतातील कामे ,भाजीपाला विक्री किंवा हाताला मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

कामगारांच्या मागण्या

कामगारांना 100% पगार मिळावा यासाठी संघटनेच्या वतीने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी व सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.त्याचसोबत मिल चालू करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेद्र मोदी , केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी , केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळ तसेच जिल्हाधिकारी व स. कामगार आयुक्त यांना अनेक वेळा पत्र पाठवली आहेत. 

पाल्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य मिळाले नाही

केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या वतीने टेक्स्टाईल मिल मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती दिली जात . यामध्ये दहावी , बारावी , पदवी आणि पदवीत्तर पदवी करणाऱ्या पाल्यांचा समावेश होता.मात्र मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक साहित्य मिळाले नाही. यामुळे दहा ते पंधरा वर्षाची परंपरा खंडित झाली आहे. 

भूमिका 
सध्याच्या आदेशानुसार मिल 30 एप्रिल पर्यंत बंद आहे . 1 मे रोजी कामगार व महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी राहते .2 मे ला मिल चालू होईल अशी आम्हाला आशा आहे . जर 2 मे रोजी मिल चालू झाली नाही तर आम्ही संघटनेची बैठक घेऊन चालू काळात कोणत्या पद्धतीने जनआंदोलन करता येईल ह्या संदर्भात चर्चा करून निर्णय घेऊ.


कामगारांचे दु:ख पाहवत नाही                                                                                            
बार्शी शहरातला मोठ्या उद्योगांपैकी असणारा हा उद्योग कोरोना काळात बंद पडला आहे . त्यामुळे अनेक वर्षाची परंपरा खंडित झाली आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या नियमानुसार अधिकारी वर्गाला पूर्ण पगार व कामगार वर्गाला 50 टक्के पगार असल्याने कामगारांसोबत दुजाभाव करत असल्याची भावना कामगारांच्या मनामध्ये आहे. मार्च महिन्याच्या हजेरी नुसार कामगारांना मिळणारा पगार हा 500 ते जास्तीत जास्त 5000 आहे . या तुटपुंज्या पगारी मध्ये कामगारांना घरखर्च चालवणे मुश्किल होत आहे. कामगारांचे हे दुःख पाहवत नाही .- नागनाथ सोनवणे , जनरल सेक्रेटरी ,बार्शी टेक्सटाईल मिलमधील राष्ट्रीय गिरणी कामगार संघ (इंटक)


कामगारांवर उपासमारीची वेळ                                                                                                                                                                                                                                    सर्व कामगारांना 100% पगार देण्यात यावा. माझ्या 28 वर्षाच्या कारकिर्दीत गिरणी कधीही बंद झाली नव्हती किंबहुना स्थापनेपासून ते लॉकडाउन पर्यंत मिल कधीही बंद नव्हती. आम्हाला सध्या मिळणाऱ्या 50% पगारी मध्ये घर चालवणे खूपच अवघड बनले आहे. त्यासाठी मी चहाची टपरी सुरू केली होती . परंतु महाराष्ट्र सरकारच्या ब्रेक द चैनच्या नियमावलीने चहाची टपरी सुद्धा बंद झाली . घरात चार सदस्य आहेत . आत्ता घर खर्च कसा भागवायचा हा आमच्या समोर पडलेला मोठा प्रश्न आहे. – रामेश्वर सपाटे ,खजिनदार राष्ट्रीय गिरणी कामगार संघ (इंटक) बार्शी                                                                                                                          

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!